रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 09:57 IST2025-09-19T09:57:25+5:302025-09-19T09:57:57+5:30
United State Crime News: अमेरिकेमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे स्थानिक पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय इंजिनियरचा मृत्यू झाला असून, मृत तरुण हा भारतातील तेलंगाणा राज्यातील रहिवासी होता.

रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू
अमेरिकेमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे स्थानिक पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय इंजिनियरचा मृत्यू झाला असून, मृत तरुण हा भारतातील तेलंगाणा राज्यातील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार सदर तरुणाचं रुममेटसोबत भांडण झालं होतं. तसेच प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचलं होतं. त्यादरम्यान शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. मग घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करताच या तरुणावर धडाधड चार गोल्या झाडल्या, असा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सदर तरुणाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, त्यांनी मुलाचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदत करण्याचं आवाहन भारत सरकार आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना केलं आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार तेलंगाणामधील महबूबनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेला मोहम्मद निजामुद्दीन हा कॅलिफोर्निया येथे वास्तव्यास होता. तिथेच पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. निजामुद्दीन हा २०१६ साली उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. त्याने फ्लोरिडा येथील कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला तिथल्याच एका कंपनीत नोकरी लागली होती. काही काळाने प्रमोशन मिळाल्यानंतर तो कॅलिफोर्निया येथे गेला होता.
दरम्यान, नातेवाईकांनी सांगितले की, गेल्या १०-१५ दिवसांपासून निजामुद्दीन याच्याशी काहीच संपर्क होत नव्हता. कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या भांडणानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात निजामुद्दीन याचा मृत्यू झाल्याची बातमी आम्हाला सोशल मीडिया आणि माहितगारांकडून शुक्रवारी मिळाली. आणय़ी एका नातेवाईकाने सांगितले की, निजामुद्दीन याचं एसीवरून रुममेटसोबत भांडण झालं होतं. त्यावरून वाद विकोपाला गेला तसेच चाकू काढले गेले. याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच त्यांना हात वर करण्यास सांगितले. पोलिसांचं ऐकून एका तरुणाने हात वर केले. मात्र निजामुद्दीन यांने पोलिसांचं म्हणणं ऐकलं नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यात निजामुद्दीन याचा मृत्यू झाला. कुठलीही माहिती न घेता पोलिसांनी गोळीबार करणं ही दुर्दैवी बाब आहे, असेही या नातेवाईकांनी म्हटले आहे.