भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 09:45 IST2025-08-03T09:44:43+5:302025-08-03T09:45:07+5:30

दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या वार्षिक कायदेविषयक संमेलनात राहुल गांधी बोलत होते.

Indian electoral system is dead, scams in elections Opposition leader Rahul Gandhi attacks Election Commission again | भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल


नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग मृतावस्थेत आणि निवडणूक प्रक्रिया उद्ध्वस्त झाल्याचा गंभीर आरोप करून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा दावा शनिवारी पुन्हा एकदा केला. आगामी काळात हे घोटाळे आपण सिद्ध करू, असेही त्यांनी सांगितले.

दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या वार्षिक कायदेविषयक संमेलनात राहुल गांधी बोलत होते. भारताचे पंतप्रधान अत्यंत अल्प बहुमत असलेले पंतप्रधान असून, १५ जागांवर घोटाळे झाले नसते तर ते भारताचे पंतप्रधान होऊ शकले नसते, असा दावाही त्यांनी केला.

होय, आमच्याकडे १००% पुरावे
या संमेलनानंतरही राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावर भर देत मतांची चोरी होत असल्याचा दावा केला. आपल्याकडे याचे ठोस पुरावे असल्याचे सांगून, आपण करीत असलेले आरोप निराधार नाहीत. याचे १०० टक्के पुरावे आपल्याकडे असल्याचेही त्यांनी निक्षून सांगितले. 

तेव्हा अरुण जेटली यांनी मला धमकावले होते !
तत्कालीन मंत्री व भाजप नेते अरुण जेटली यांचा उल्लेख करत विरोधी पक्षनेत राहुल गांधी पुढे म्हणाले की, ‘मला आठवते, मी कृषी कायद्याविरुद्ध लढत असताना अरुण जेटली यांना मला धमकी देण्यासाठी पाठवण्यात आले होते. कृषी कायद्यासह सरकारविरुद्ध तुमची अशीच भूमिका राहिली तर तुमच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल, असे जेटली यांनी तेव्हा आपल्याला धमकावले होते, असे ते म्हणाले.

जेटलींच्या उल्लेखावर भाजपचा पलटवार
राहुल गांधी २०२० मध्ये लागू केलेल्या कृषी कायद्याविषयी बोलत आहेत. परंतु, वास्तव हे आहे की, अरुण जेटली यांचे निधन २४ ऑगस्ट २०१९ रोजी झाले होते. 

कृषी कायद्याचा पहिला मसुदा ३ जून २०२० रोजी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडला गेला आणि हा कायदा सप्टेंबर २०२० रोजी लागू झाला, असे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

पित्याच्या आत्म्याला शांत राहू द्या : रोहन जेटली
दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी राहुल गांधी यांच्या टिप्पणीवर आक्रमक होत सोशल मीडियावर म्हटले की, ‘माझे वडील अरुण जेटली हे सत्यवादी व लोकशाहीवादी व्यक्ती होते. सुसंवाद आणि सहमतीवर त्यांचा विश्वास होता. त्यांच्या आत्म्याला तरी शांततेत राहू द्या.’
 

Web Title: Indian electoral system is dead, scams in elections Opposition leader Rahul Gandhi attacks Election Commission again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.