भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 06:26 IST2025-08-01T06:23:03+5:302025-08-01T06:26:06+5:30

आर्थिक, संरक्षण, परराष्ट्र धोरणाचा केंद्राकडून विचका झाल्याचा केला आरोप

indian economy is currently dead donald trump spoke the truth congress opposition leader rahul gandhi criticizes | भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका

भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत आहे, हे पंतप्रधान व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन वगळता सर्वांनाच माहिती आहे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले.  भाजप सरकारने देशाचे आर्थिक, संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाचा विचका केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी संसद भवन परिसरात पत्रकारांना सांगितले की, भारत आणि अमेरिकेत व्यापार करार होणार असून ट्रम्प त्यासाठी त्यांच्या अटी घालतील व केंद्र सरकार ट्रम्प सांगतील ते मान्य करेल. ट्रम्प यांनी भारत, रशियाची अर्थव्यवस्था मृत आहे, अशीही टीका केली. ट्रम्प यांनी केलेली टीका योग्य आहे. नोटाबंदीचा निर्णय, अनेक त्रुटी असलेली जीएसटी प्रणाली, असेम्बल इन इंडियाची फसलेली मोहीम, लघु-मध्यम उद्योगांची खराब स्थिती, शेतकऱ्यांवर झालेला मोठा अन्याय, तरुणांसाठी देशात नोकऱ्याच नाहीत, ही केंद्र सरकारची कामगिरी आहे. 

ते म्हणाले की, आपले परराष्ट्र धोरण अतिशय उत्तम आहे, असे परराष्ट्रमंत्री सांगत असतात. मात्र एका बाजूला अमेरिका भारताची निंदा करत आहे. तर दुसऱ्या बाजूस चीन आपल्यावर दबाव टाकत आहे.

ट्रम्प यांना केंद्र सरकार उत्तर का देत नाही?

राहुल गांधी यांनी सांगितले की, पहलगाम हल्ल्यामागे असलेल्या पाकच्या लष्करप्रमुखांना ट्रम्प मेजवानी देतात. असे असूनही पाकविरोधात आम्हाला खूप मोठे यश मिळाले, असा केंद्र सरकार दावा करते. भारत-पाकमध्ये मी शस्त्रसंधी घडवून आणली, दोन देशांच्या संघर्षात भारताची पाच विमाने पाडण्यात आली, भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू करणार अशी वक्तव्ये डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. केंद्र सरकार त्या वक्तव्यांना उत्तर का देत नाही? त्याचे नेमके कारण काय आहे, असे सवालही गांधी यांनी विचारले.

...तर आपल्याला माघार घ्यावी लागेल : थरूर

भारत व अमेरिकेची सध्या व्यापार करारासाठी चर्चा सुरू आहे. भारतावर दबाव टाकण्यासाठी ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावला, असे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी म्हटले.  जर चांगला करार शक्य झाला नाही, तर आपल्याला माघार घ्यावी लागू शकते, असेही थरूर म्हणाले. अमेरिका पाकमध्ये ‘तेलाचे साठे’ विकसित करण्यासाठी काम करणार आहेत. त्यांना शुभेच्छा आहेत.  भारताला बॉम्बे हायमध्ये काही तेल सापडले, पण आम्ही ८६ टक्के इंधन आयात करतो.  जर कोणताही व्यापार करार झाला नाही तर त्याचा भारताच्या निर्यातीवर निश्चितच परिणाम होईल. अमेरिका आमच्यासाठी खूप मोठी बाजारपेठ आहे, असे ते पुढे म्हणाले.

राहुल गांधी यांनी १४० कोटी जनतेचा अपमान केला

भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा राहुल गांधी यांनी सातत्याने अपमान केला आहे. १४० कोटी जनता आपल्या मेहनतीतून देशाचे भविष्य घडवत असताना तिचा राहुल गांधी यांनी अपमान केला आहे. भारतीय अर्थव्यवस्था मृत नसून राहुल गांधी यांची राजकीय विश्वासार्हता मृतावस्थेत आहे. - अमित मालवीय, भाजप आयटी सेल.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी टॅरिफबद्दल काय म्हटले ते सर्वांनी पाहिले आहे. पंतप्रधान सर्वत्र जातात, मित्र बनवतात आणि मग आपल्याला शेवटी काय मिळत आहे ते आपण पाहत आहोत. - प्रियांका गांधी, काँग्रेस खासदार.

भारत सरकारने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी असलेल्या त्यांच्या बहुचर्चित वैयक्तिक मैत्रीवर जो विश्वास ठेवला होता, तो पूर्णपणे पोकळ ठरला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वाणिज्य मंत्र्यांनी  फक्त स्वतःची प्रशंसा केली. - जयराम रमेश, काँग्रेस सरचिटणीस.

सरकार शेती आणि एमएसएमई क्षेत्राच्या हितासाठी काम करेल. याबाबत दोन्ही देशांत चर्चा सुरू आहे. सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तोडगा काढण्यास सक्षम आहेत.- संजय कुमार झा, खासदार, जदयू.

भारतावर लादलेल्या टॅरिफबाबत काँग्रेस सरकारच्या कायम पाठीशी आहे. - मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष.

 

Web Title: indian economy is currently dead donald trump spoke the truth congress opposition leader rahul gandhi criticizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.