जगातील सर्वोच्च शिखर 'माउंट एव्हरेस्ट' सर करताना पश्चिम बंगालचे ४५ वर्षीय गिर्यारोहक सुब्रत घोष यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी यशस्वीरित्या शिखर गाठल्यानंतर खाली उतरताना ही दुर्घटना घडली. नेपाळच्या स्नोई होरायझन ट्रेक्स अँड एक्सपिडिशनचे व्यवस्थापकीय संचालक बोधराज भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुब्रत घोष यांनी ८,८४८ मीटर उंचीवर असलेल्या माउंट एव्हरेस्टचे शिखर गाठले होते. मात्र, परतीच्या वाटेवर, अत्यंत धोकादायक आणि प्राणघातक समजल्या जाणाऱ्या हिलरी स्टेपजवळ ते अचानक कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
‘डेथ झोन’मध्ये ऑक्सिजनची तीव्र कमतरताहिलरी स्टेप हे एव्हरेस्टच्या शिखराच्या अगदी काही मीटर खाली असलेले ठिकाण आहे. याला ‘डेथ झोन’ असेही म्हटले जाते. कारण येथे नैसर्गिक ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी असते, आणि अशा वातावरणात मानवाचे शरीर फार काळ तग धरू शकत नाही. रात्री २ वाजता सुब्रत आणि त्यांचा मार्गदर्शक शिखरावर पोहोचले होते. मात्र, उतरतानाच सुब्रत यांची तब्येत बिघडली. त्यांनी पुढे कूच करण्यास नकार दिला आणि काही वेळातच हिलरी स्टेपवरून पडून त्यांचा मृत्यू झाला.
मृतदेह खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरूनेपाळ प्रशासन आणि ट्रेकिंग कंपनीच्या पथकाने सुब्रत घोष यांचा मृतदेह बेस कॅम्पवर आणण्यासाठी मोहीम राबवली आहे. अत्युच्च उंचीमुळे आणि प्रतिकूल हवामानामुळे हे कार्य अतिशय कठीण मानले जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे भंडारी यांनी सांगितले.
फिलिपिनो गिर्यारोहकाचाही मृत्यूनेपाळ पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामातील एव्हरेस्टवरचा हा दुसरा मृत्यू आहे. याआधी फिलिपिन्समधील ४५ वर्षीय गिर्यारोहक फिलिप सॅंटियागो यांचेही निधन झाले होते. ते एव्हरेस्टवर चढाई करताना कॅम्प ४ वर पोहोचले होते, मात्र थकव्यामुळे विश्रांती घेत असतानाच अचानक त्यांचे निधन झाले.