नवी दिल्ली : अलीकडील एका अभ्यासानुसार, भारतातील पाच वर्षांखालील बालकांचा दररोजचा स्क्रीन टाईम सरासरी २.२ तास असल्याचे आढळून आले आहे. हा स्क्रीन टाईम सुरक्षित मर्यादेपेक्षा दुप्पट आहे. यामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
‘क्युरस’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात एम्स, रायपूर येथील डॉ. आशिष खोब्रागडे आणि डॉ. एम. स्वाथी शेनॉय यांनी २,८५७ मुलांचा समावेश असलेल्या १० अभ्यासांच्या मेटा-विश्लेषणानंतर हे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. या अभ्यासानुसार, दोन वर्षांखालील मुलांचा स्क्रीन टाईम सरासरी १.२ तास आहे. दोन वर्षांपर्यंतच्या मुलांनी पूर्णपणे स्क्रीन टाळावी, असे मार्गदर्शक तत्त्वात सांगितले आहे.
मूल रडले म्हणून मोबाइल देणे टाळा फेलिक्स हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. डी. के. गुप्ता यांनी सांगितले की, “सुमारे ६०-७०% मुले सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त वेळ स्क्रीनवर घालवत आहेत. त्यामुळे त्यांच्यात शारीरिक व वागणुकीसंबंधी समस्या दिसून येत आहेत.” त्यांनी पालकांनी जेवताना किंवा मुलं रडत असताना त्यांना मोबाइल देणे टाळावे असे आवाहन केले. नाही तर ही सवय हळूहळू व्यसनात बदलते. पालकांनी स्वतःचा स्क्रीन वापर कमी करावा. मुलांच्या वाढत्या स्क्रीन टाईममुळे भाषिक विकास, बौद्धिक क्षमता आणि सामाजिक कौशल्यांवर परिणाम होतो. तसेच स्थूलता, झोपेचे विकार आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात, असे आढळून आले आहे.
उपाय काय?घरात टेक-फ्री झोन तयार करणे.स्क्रीन टाईमसाठी ठरावीक वयोमर्यादेनुसार नियम बनवणे.मुलांना बाह्य खेळ आणि प्रत्यक्ष सामाजिक संवादात सहभागी करणे.पालकांनी स्वतःच्या सवयी बदलणे, म्हणजेच स्क्रीनसंदर्भातील सकारात्मक उदाहरण देणे.