चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 02:26 IST2025-05-08T02:26:03+5:302025-05-08T02:26:15+5:30
मंगळ व शुक्र ग्रह भारताच्या रडारवर : मोदी; इस्रो-नासाच्या संयुक्त मोहिमेत २९ मे रोजी ‘एक्सिओम-४’चे प्रक्षेपण

चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
नवी दिल्ली : भारत अंतराळ संशोधन क्षेत्रात नव्या विश्वासाने पुढे जात असून, भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह चंद्रावर उमटणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हटले आहे.
जागतिक अंतराळ संशोधन संमेलनात आपल्या रेकॉर्ड केलेल्या संदेशात मोदींनी म्हटले आहे की, संशोधनाच्या मोहिमांमध्ये मंगळ व शुक्रही आमच्या रडारवर आहेत. भारताच्या अंतराळ मोहिमा दुसऱ्यांशी स्पर्धा करण्यासाठी नाहीत. याचा अर्थ एकजुटीने मिळून उंची गाठूया, असा आहे. आम्ही मानवतेच्या भल्यासाठी अंतराळ संशोधन करण्यासाठी मिळून लक्ष्य साध्य करू इच्छित आहोत.
भारताने दक्षिण आशियायी देशांसाठी एक उपग्रह प्रक्षेपित केला आणि जी-२० देशांच्या अध्यक्षतेच्या कालावधीत घोषित ‘जी-२०’ उपग्रह मोहीम, ग्लोबल साऊथसाठी एक भेट असेल.
२०२७ च्या सुरुवातीच्या प्रस्तावित प्रक्षेपणाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, आपली पहिली मानवीय अंतराळ ‘मोहीम गगनयान’ आमच्या देशाच्या वाढत्या अपेक्षा दर्शवते.
१९६३ पासून आतापर्यंतचा अंतराळ प्रवास उल्लेखनीय
आगामी आठवड्यांमध्ये एक भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी इस्रो-नासाच्या संयुक्त मोहिमेद्वारे अंतराळाचा प्रवास करणार आहे. ‘एक्सिओम-४’ २९ मे रोजी प्रक्षेपित होणार असून शुभांशु शुक्ला व अन्य तीन जण कक्षीय प्रयोगशाळेत १४ दिवसांचा प्रवास करतील. अशाच प्रकारे ‘ग्लेक्स २०२५’चे आयोजन आंतरराष्ट्रीय अंतराळ प्रवासी महासंघ व भारतीय अंतराळ संशोधन संघटनेकडून केले जाणार आहे.
अंतराळ केवळ साध्य नाही. ते जिज्ञासा, साहस व सामूहिक प्रगतीची घोषणा आहे. २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक संशोधन व जागतिक सहयोगामध्ये नवीन दालन उघडणार आहे. वर्ष २०४० पर्यंत कोणत्याही प्रकारे भारताचे पदचिन्ह चंद्रावर उमटणार आहे. मंगळ व शुक्र आमच्या रडारवर आहेत. १९६३मध्ये एक छोटे रॉकेट लाँच करण्यापासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा देश बनण्यापर्यंतचा भारताचा प्रवास उल्लेखनीय आहे.