भारतीय लष्करामधील महिला अधिकाऱ्यांसंदर्भात लीक झालेल्या एका पत्राची थेट लष्करप्रमुखांनी गंभीर दखल घेतली आहे. लष्करामध्ये महिला अधिकारी खूप चांगली कामगिरी करत आहेत. तसेच सशस्त्र दलांमध्ये त्यांची संख्या वाढवण्यासाठी विचार केला जात आहे, असे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले आहे. लष्करातील वरिष्ठ कमांडरांनी महिलांकडे नेतृत्व असलेल्या विभागांसमोर उभ्या राहणाऱ्या समस्या समोर आणल्या होत्या. मात्र त्यांना फार महत्त्व न देता लष्करप्रमुखांनी हे विधान केलं आहे. महिला अधिकाऱ्यांच्या शौर्यावर कुठलाही संशय घेऊ नये, असा स्पष्ट संदेशही लष्करप्रमुखांनी यामधून दिला आहे.
काही दिवसांपूर्वी लष्करामधील महिलांच्या भागीदारीबाबत कोअर कमांडर लेफ्टिनंट जनरल राजीव पुरी यांनी एक पत्र लिहिलं होतं. पुरी यांनी लष्कराच्या ईस्टर्न आर्मीच्या कमांडरांना पाठवलेल्या अभिप्रायामध्ये महिला अधिकाऱ्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती. पुरी यांनी हे पत्र लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल रामचंद्र तिवारी यांना लिहिले होते. त्यांनी या पत्रामधून कर्नल रँकच्या महिला अधिकाऱ्यांचा समजुतदारपणा आणि व्यवहार कौशल्याच्या कमतरतेकडे लक्ष वेधले होते. जनरल पुरी यांनी या पत्रामध्ये अहंकारीपणा, सातत्याने होणाऱ्या तक्रारी आणि सहानुभूतीची कमतरता, यांचाही उल्लेख केला. मात्र नंतर हे पत्र लीक झाले होते. त्यानंतर वादाला तोंड फुटले होते.
मात्र आता लष्करप्रमुखांनी याबाबत स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. जनरल द्विवेदी यांनी लष्कर दिनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की, काही महिला अधिकारी उल्लेखनीय पद्धतीने चांगलं काम करत आहेत. जे पत्रल लीक झालंय, ते लीक होता कामा नये होतं. या प्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. लष्कराला कालीमातेचं रूप असलेल्या सक्षम महिला अधिकारी हव्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.