चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:15 IST2025-11-07T15:15:16+5:302025-11-07T15:15:43+5:30
India-Bangladesh Border: गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर बदलत असलेली राजकीय हितसंबंधांची समिकरणं तसेच पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये झालेली जवळीक यामुळे भारतासाठी आपल्या ईशान्य भागातील सुरक्षेवर अधिक लक्ष ठेवणं आवश्यक बनलं आहे.

चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर बदलत असलेली राजकीय हितसंबंधांची समिकरणं तसेच पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये झालेली जवळीक यामुळे भारतासाठी आपल्या ईशान्य भागातील सुरक्षेवर अधिक लक्ष ठेवणं आवश्यक बनलं आहे. त्यातही देशाच्या इतर भागाला ईशान्य भारताशी जोडणाऱ्या आणि चिकन नेक अशी ओळख असलेल्या सिलिगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कराने या भागात तीन नव्या चौक्या उभ्या केल्या आहेत. या तीन चौक्या ह्या बमुनी, किशनगंज आणि चोपडा येथे उभ्या करण्यात आल्या आहेत. या चौक्या उभारण्याचा हेतू सीमेवर कमकुवत सुरक्षा व्यवस्था असलेल्या भागात सुरक्षा वाढवणे, गस्त वाढवणे आणि सिलिगुडी कॉरिडॉरचं रक्षण करणे हा आहे.
सिलिगुडी कॉरिडॉरला चिकन नेक म्हणून ओळखलं जातं. हा अरुंद पट्टा भारताच्या इतर भागाला ईशान्य भागातील राज्यांशी जोडतो. या भागाची लांबी काही ठिकाणी केवळ २२ किमी एवढी कमी आहे. तसेच या भागालाच लागून बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि चीन या देशांच्या सीमा आहेत. त्यामुळे सिलिगुडी कॉरिडॉर अत्यंत संवेदनशील असून, हा भाग बंद झाल्यास भारताचा ईशान्य भारताशी असलेला संपर्क तुटू शकतो.
दरम्यान, बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी पाकिस्तानी जनरल साहिर शमशाद मिर्झा यांची भेट घेऊन चर्चा केली. यामध्ये कनेक्टिव्हिटी आणि संरक्षण संबंधांबाबत चर्चा केली होती. मोहम्मद युनूस यांनी शेख हसिना सत्तेतून पायउतार झाल्यानंतर चीनला गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला होता. तसेच पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्याबाबत विचारविनिमय केला होता.