'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 18:35 IST2025-12-23T18:34:18+5:302025-12-23T18:35:09+5:30
Indian Army: 'भारताने अल्पकालीन तीव्र युद्ध, तसेच दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षांसाठी नेहमी सज्ज राहिले पाहिजे.'

'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
Indian Army: भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी भारताला भविष्यातील युद्धासाठी नव्या पद्धतीने तयार राहण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. सोमवारी IIT मुंबई येथे विद्यार्थ्यांशी आणि तज्ज्ञांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, भारताने अल्पकालीन तीव्र युद्ध, तसेच दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षांसाठी नेहमी सज्ज राहिले पाहिजे.
दोन्ही शेजारी देशांकडून धोका
जनरल चौहान पुढे म्हणतात, भारताला दोन शेजारी देशांकडून धोका आहे. एक देश न्यूक्लिअर वेपन स्टेट आहे, तर दुसरा न्यूक्लिअर आर्म्ड स्टेट आहे. त्यामुळे ‘डिटरन्स’ म्हणजेच प्रतिबंधक ताकद कमकुवत होऊ देता कामा नये. जरी त्यांनी थेट नावे घेतली नसले, तरी त्यांचा थेट रोख पाकिस्तान आणि चीनकडे असल्याचे स्पष्ट होते.
🚨 CDS Anil Chauhan: “We must be READY for short, high-intensity conflicts to deter terrorism, like Operation Sindoor.”
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) December 23, 2025
“At the same time, we should prepare for land-centric, long-duration conflicts due to existing land disputes.” pic.twitter.com/Q3DsySAbnn
अल्पकालीन तीव्र युद्ध आणि दीर्घकालीन संघर्ष
दहशतवादाला रोखण्यासाठी कमी वेळात होणाऱ्या, पण अत्यंत तीव्र युद्धासाठी आपण तयार राहिले पाहिजे, जसे की ऑपरेशन सिंदूर. तसेच भूसीमावादामुळे उद्भवू शकणाऱ्या दीर्घकालीन, जमीन-केंद्रित युद्धासाठीही तयारी हवी, मात्र असे युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही चौहान म्हणाले.
युद्ध तिसऱ्या क्रांतीच्या उंबरठ्यावर
युद्ध आता तिसऱ्या क्रांतीच्या टप्प्यावर पोहोचत आहे, ज्याला ‘कन्वर्जन्स वॉरफेअर’ म्हणतात. या नव्या युद्धपद्धतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), क्वांटम कंप्युटिंग, एज कंप्युटिंग, हायपरसोनिक शस्त्रे, प्रगत साहित्य, रोबोटिक्स आणि मल्टी-डोमेन ऑपरेशन्स अपरिहार्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
ऑपरेशन सिंदूरचे उदाहरण
जनरल चौहान यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत सांगितले की, हे युद्ध केवळ चार दिवस चालले, पण भारताला निर्णायक विजय मिळाला. कारण सर्व क्षेत्रांमध्ये एकाच वेळी आणि वेगाने कारवाई करण्यात आली. मल्टी-डोमेन ऑपरेशन्ससाठी लष्कर, नौदल, हवाई दल यांच्यासोबतच सायबर, स्पेस आणि कॉग्निटिव्ह डोमेन (मानसिक युद्ध) यांतील दलांमध्ये घनिष्ठ समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.