टॅरिफच्या तणावात भारतीय राजदूतांकडून सिनेटर्सची भेट, दोन्ही देशांतील व्यापारी संबंधांवर केली व्यापक चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 06:26 IST2025-08-24T06:25:56+5:302025-08-24T06:26:11+5:30
India-US Relation News: अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी आपल्या मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून अनेक अमेरिकी सिनेटर्सशी चर्चा केली. टॅरिफवरून दोन्ही देशांत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी संबंध सुधारण्याच्या दृष्टीने ही चर्चा झाली.

टॅरिफच्या तणावात भारतीय राजदूतांकडून सिनेटर्सची भेट, दोन्ही देशांतील व्यापारी संबंधांवर केली व्यापक चर्चा
न्यूयॉर्क - अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी आपल्या मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून अनेक अमेरिकी सिनेटर्सशी चर्चा केली. टॅरिफवरून दोन्ही देशांत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी संबंध सुधारण्याच्या दृष्टीने ही चर्चा झाली.
क्वात्रा यांनी केलेल्या पोस्टनुसार ९ ऑगस्टपासून आतापर्यंत त्यांनी १९ अमेरिकी सिनेटर्सची भेट घेतली असून, काँग्रेसच्या काही सदस्यांशीही चर्चा केली आहे. शुक्रवारी त्यांनी ‘वेज अँड मीन्स कमिटी’ तसेच ‘हाऊस इंटेलिजन्स कमिटी’च्या सदस्य क्लाऊडिया टेनी यांची भेट घेतली. दोन्ही देशांत निष्पक्ष आणि संतुलित व्यापारी संबंधांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली.
हायड्रोकार्बन खरेदी, कृषी, परराष्ट्र विषयांवर चर्चा
भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात हायड्रोकार्बनची खरेदी करीत आहेत. भारतातील ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हा व्यवहार अत्यंत महत्त्वाचा असल्याचे क्वात्रा यांनी टेनी यांच्याशी चर्चेदरम्यान नमूद केले. अशाच अन्य एका बैठकीत डेमोक्रॅट सदस्य जोनाथन जॅक्सन यांच्याशी चर्चा केली. परराष्ट्र आणि कृषिविषयक समितीचे जॅक्सन हे सदस्य आहेत.
संतुलित व्यापारी संबंधांवर भर
अमेरिकी काँग्रेसच्या मिशिगन येथील सदस्य हेली स्टिव्हन्स यांच्या भेटीतही क्वात्रा यांनी अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हायड्रोकार्बनच्या खरेदीचा खास उल्लेख केला. संतुलित व्यापारी संबंधांच्या दृष्टीने या व्यवहाराचे वेगळे महत्त्व असल्याचे क्वात्रा म्हणाले.
भेटीगाठींचे हे आहे कारण
ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू केल्यानंतर दोन्ही देशांत तणाव वाढला आहे. रशियाकडून सुरू असलेली इंधन तेलाची खरेदी भारताच्या ऊर्जा क्षेत्रासह राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले.