Indian Air Strike on Pakistan: वायुदलाची धाडसी कामगिरी; अजित डोवालांनी सांगितली एअर स्ट्राइकची ए बी सी डी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 22:38 IST2019-02-26T22:36:16+5:302019-02-26T22:38:16+5:30
अवघ्या 21 मिनिटांत हवाई दलाकडून 300 दहशतवाद्यांचा खात्मा

Indian Air Strike on Pakistan: वायुदलाची धाडसी कामगिरी; अजित डोवालांनी सांगितली एअर स्ट्राइकची ए बी सी डी
नवी दिल्ली: भारतीय हवाई दलानंपाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान हवाई दलानं धाडसी कारवाई करत जैश-ए-मोहम्मदला दणका दिला. नियंत्रण रेषा ओलांडून कारवाई करत भारतानं 12 दिवसांपूर्वी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. यानंतर कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची बैठक झाली. यावेळी समितीच्या सदस्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी कारवाईची संपूर्ण माहिती दिली.
कॅबिनेटच्या सुरक्षा समितीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, अर्थ मंत्री अरुण जेटली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हवाई दलाच्या धडाकेबाज कारवाईत जैशचे 25 टॉप कमांडर मारले गेल्याचं डोवाल यांनी समिती सदस्यांना सांगितलं. 'भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राइकमध्ये जैशचे बहुतांश टॉप कमांडर मारले गेले. त्यामुळे या हल्ल्यात जैशचं मोठं नुकसान झालं,' अशी माहिती त्यांनी दिली.
बालाकोट जैशचा सुरक्षित बालेकिल्ला समजला जातो. हा भाग चहूबाजूंनी जंगलांनी वेढलेला आहे. जैशचा सुरक्षित तळ मानला जाणारा बालकोट उद्ध्वस्त झाल्यानं जैशला हादरा बसला. हा तळ साधासुधा नव्हता, असं अजित डोवाल समितीच्या बैठकीत म्हणाले. 'नष्ट करण्यात आलेल्या दहशतवादी तळावर फायरिंग रेंज, स्फोटक परीक्षण सुविधा, प्रशिक्षकांसाठी वातानुकूलित कार्यालयं होती. याशिवाय या तळावर स्विमिंग पूल, मनोरंजन केंद्र यासारख्या सोयीदेखील होत्या. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयकडून या सुविधा पुरवल्या जात होत्या,' अशी महत्त्वपूर्ण माहिती डोवाल यांनी दिली.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी तळांवर मोठ्या संख्येनं भरती सुरू होती, असं डोवाल म्हणाले. 'भारताच्या हल्ल्यात जैशचे दहशतवादी, प्रशिक्षक, टॉप कमांडर आणि जिहादी मारले गेले. या ठिकाणी आत्मघाती हल्ले घडवण्याच्या तयारीत असलेल्या 42 जणांना प्रशिक्षण देण्यात येत होतं. याबद्दलची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली. यानंतर या भागातील सूत्रांच्या मदतीनं अधिकची माहिती मिळवल्यानंतर हवाई दलानं गुप्तचर विभागाच्या मदतीनं दहशतवादी तळांवर जोरदार हल्ले चढवले,' अशी माहिती डोवाल यांनी दिली.