भारतीय हवाई दलाच्या एअरस्ट्राइकमध्ये जैशच्या चार इमारती जमीनदोस्त, समोर आले पुरावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 14:31 IST2019-03-02T13:46:16+5:302019-03-02T14:31:35+5:30
भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास पाकिस्तानमधील बालाकोट येथे जबरदस्त एअर स्ट्राइक करून जैश ए मोहम्मदच्या तळाला लक्ष्य केले होते.

भारतीय हवाई दलाच्या एअरस्ट्राइकमध्ये जैशच्या चार इमारती जमीनदोस्त, समोर आले पुरावे
नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास पाकिस्तानमधील बालाकोट येथे जबरदस्त एअर स्ट्राइक करून जैश ए मोहम्मदच्या तळाला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात जैशचा म्होरक्या मसूद अझहर याच्या भावासह अनेक दहशतवादी ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेल्या या एअर स्ट्राइकच्या परिणामांचे पुरावे समोर आले असून, या जबरदस्त हल्ल्यात जैशच्या तामील उल कुराण या मदरशाच्या चार इमारती जमीनदोस्त झाल्याचे एसएआर छायाचित्रांमधून समोर आले आहे. दरम्यान, काही तांत्रिक अडचणी आणि सीमेपलीकडची गुप्त माहिती मिळण्यात असलेले अडथळे यामुळे या कारवाईत नेमका किती जणांचा मृत्यू झाला याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय गुप्तहेर यंत्रणांकडे एसएआरच्या मदतीने टिपलेली छायाचित्रे उपलब्ध आहेत. या छायाचित्रांमध्ये हवाई दलाकडून लक्ष्य करण्यात आलेल्या चार इमारती पूर्णपणे नष्ट झाल्याचे दिसत आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
दरम्यान, भारतीय हवाई दलानेपाकिस्तानी हद्दीत घुसून कारवाई केल्यानंतर पाकिस्ताननेही हल्ला झाल्याची कबुली दिली होती. मात्र बालाकोट येथे ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे दहशतवाद्यांचे तळ असल्याचे वा त्यात कुणाचा मृत्यू झाल्याचे मान्य केले नाही. मात्र हल्ला झालेल्या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याने प्रवेशबंदी का केली, तसेच तिथे प्रसारमाध्यमांना का जाऊ दिले नाहीत, असे प्रश्न एका भारतीय अधिकाऱ्याने उपस्थित केले आहेत.
'' ज्या इमारती नष्ट करण्यात आल्या, त्यांचा वापर प्रशिक्षित दहशतवाद्यांसाठी निवासस्थानासारखा करण्यात येत होता. तसेच तिथे मसूद अझहरचा भाऊसुद्धा वास्तव्य करत होता. एसएआरच्या सहाय्याने घेण्यात आलेल्या छायाचित्रांमधून आमच्याकडे योग्य ते पुरावे उपलब्ध आहेत. आता ही छायाचित्रे सार्वजनिक करायची की नाही याचा निर्णय राजकीय नेतृत्वाने घेतला पाहिजे,'' अधिकाऱ्यांनी सांगितले.