'भारत आता मुस्लीम लीगच्या मानसिकतेने चालणार नाही'; योगी आदित्यनाथांनी संभलबद्दल सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 19:29 IST2025-01-10T19:28:16+5:302025-01-10T19:29:20+5:30
संभलमधील जामा मशिदीचा वाद देशभरात चर्चेत आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वेगळी भूमिका मांडली होती. त्यावर आता योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले आहे.

'भारत आता मुस्लीम लीगच्या मानसिकतेने चालणार नाही'; योगी आदित्यनाथांनी संभलबद्दल सोडलं मौन
Yogi Adityanath News: आमचा जुना वारसा परत मिळवणे ही वायफळ गोष्ट नाहीये, असे म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संभलमधील वादावर मौन सोडले. ज्या मालमत्तांवर वक्फ बोर्डाकडून दावे केले जात आहेत, त्यावर योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संभलमधील शाही जामा मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर होते, असा दावा केला गेला. त्यामुळे कोर्टाने या मशिदीचे सर्वे करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वाद चिघळला. सध्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी असे मुद्दे आता काढू नये, असे म्हटले होते. त्यानंतर आता योगी आदित्यनाथ यांनी भूमिका मांडली आहे.
योगी आदित्यनाथ काय बोलले?
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आजतक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संभलमधील जागेच्या वादावर भूमिका मांडली.
आदित्यनाथ म्हणाले, "जुना वारसा परत मिळवणे, ही वाईट गोष्ट नाहीये. संभलमध्ये सनातन धर्माशी संबंधित अनेक पुरावे मिळाले आहेत. भारत आता मुस्लीम लीगच्या मानसिकतेने चालणार नाही."
शाही जामा मशिदीच्या सर्वे वेळी झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर जोर देत योगी आदित्यनाथ म्हणाले की, पुराणांमध्ये कल्किचे जन्मस्थान संभल सांगितले गेले आहे. कल्कि हा हिंदूंचे ईश्वर भगवान विष्णुंचा १०वा अवतार मानला जातो.
'संभलमधील हरिहर मंदिर पाडून...'
"वर्ष १५९६ मध्ये संभलमध्ये एक हरिहर मंदिर तोडून, एक बांधकाम करण्यात आले होते. त्याचा उल्लेख आइन ए अकबरी असाही केलेला आहे", असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंदिर-मशीद मुद्दे आता उचलू नयेत, असे म्हटले होते. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी अयोध्येमध्ये राम मंदिर झाले. ती सर्वांची इच्छा होती. पण, दररोज असे नवीन मुद्दे उकरून काढणे स्वीकारार्ह नाही, असे मत त्यांनी मांडले होते. त्यानंतर आता योगींनी केलेल्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे.