समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 14:42 IST2025-08-24T14:41:07+5:302025-08-24T14:42:44+5:30

India Germany Submarine Deal: भारताने जर्मनीच्या सहकार्याने सहा हाय-टेक पाणबुड्या बांधण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे.

India will build six submarines in collaboration with Germany the government has approved Rs 70000 crore | समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार

समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार

Project-75I: भारत सरकारने हवाई दल आणि नौदलाची ताकद वाढवण्यासाठी दोन मोठे करार करण्यास सहमती दर्शवली आहे. केंद्र सरकारने संरक्षण मंत्रालय आणि माझगाव डॉकयार्ड्स लिमिटेडला प्रोजेक्ट ७५ इंडिया अंतर्गत ७० हजार कोटी रुपयांच्या सहा पाणबुड्यांच्या खरेदीसाठी बोलणी सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यासोबतच भारत सरकार इस्रायली रॅम्पेज एअर-टू-ग्राउंड क्षेपणास्त्रांचा मोठा साठा खरेदी करणार आहे. पाकिस्तानमधील मुरीदके आणि बहावलपूर येथील दहशतवादी मुख्यालयांवर अचूक हल्ल्यांमध्ये रॅम्पेज क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला होता.

भारताने हिंदी महासागरात आपली ताकद अनेक पटींनी वाढवण्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने ७० हजार कोटी रुपयांच्या प्रोजेक्ट-७५ इंडियाला अखेर मान्यता दिली आहे. या अंतर्गत भारत आणि जर्मनी संयुक्तपणे सहा प्राणघातक पाणबुड्या बांधतील. संरक्षण मंत्रालयाने जानेवारीमध्ये जर्मन कंपनी थायसेनक्रुप मरीन सिस्टम्ससह एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन सिस्टमसह सहा पाणबुड्या बांधण्यासाठी माझगाव डॉकयार्डची भागीदार म्हणून निवड केली होती. संरक्षण मंत्रालय आणि एमडीएल यांच्यात या महिन्याच्या अखेरीस ही प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे.

केंद्राने उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेतला. त्यात संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांचा समावेश होता. या बैठकीत देशाच्या पाणबुडी ताफ्याचा रोडमॅप आणि भविष्य यावर चर्चा करण्यात आली. यासोबतच भारत सरकार इस्रायली रॅम्पेज हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा मोठा साठा खरेदी करणार आहे. 

पारंपारिक डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या जास्त काळ पाण्याखाली राहू शकत नाहीत. त्यांना दर काही दिवसांनी पृष्ठभागावर यावे लागते आणि त्यांच्या बॅटरी चार्ज कराव्या लागतात. त्या मर्यादित काळासाठीच टिकतात. जेव्हा त्या पृष्ठभागावर येतात तेव्हा त्या शत्रूच्या रडारवर सहजपणे येऊ शकतात. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी, एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन प्रणाली विकसित करण्यात आली.

एआयपी प्रणालीने सुसज्ज असलेल्या पाणबुड्या ३ आठवडे पाण्याखाली राहू शकतात. भारताच्या स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुड्या सध्या डिझेल-इलेक्ट्रिक आहेत. पण या डीआरडीओच्या इंधन सेल आधारित एआयपीने सुसज्ज असतील. फ्युएल सेलमधून चालणारी एअर इंडिपेंन्डेंट सिस्टिम ऑक्सिजन साठवून ऊर्जा निर्माण करते. हे त्याच्यासाठी इंधन म्हणून काम करते. ज्यामुळे पाणबुडी दीर्घकाळ चालवता येते.

Web Title: India will build six submarines in collaboration with Germany the government has approved Rs 70000 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.