अर्थव्यवस्थेला अच्छे दिन! 2018 मध्ये सर्वाधिक वेगानं वाढणार- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 15:06 IST2018-05-09T15:06:33+5:302018-05-09T15:06:33+5:30
आशिया खंडात भारतीय अर्थव्यवस्था वेगानं घोडदौड करणार

अर्थव्यवस्थेला अच्छे दिन! 2018 मध्ये सर्वाधिक वेगानं वाढणार- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
नवी दिल्ली: यंदाच्या वर्षात अर्थव्यवस्था वाढीच्या वेगात आशिया खंडातील देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर असेल, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलंय. 2018 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग 7.4 टक्के इतका असेल. तर 2019 मध्ये हा वेग 7.8 टक्क्यांवर जाईल, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं अहवालात म्हटलंय. यामुळे आर्थिक आघाडीवर मोदी सरकारसाठी परिस्थिती अनुकूल असेल, असं चित्र दिसतंय.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 'एशिया अॅण्ड पॅसिफिक रिजनल इकॉनॉमिक आऊटलूक रिपोर्ट' जाहीर केला. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विशेष उल्लेख करण्यात आलाय. 'नोटाबंदी आणि जीएसटीच्या परिणामांमधून भारतीय अर्थव्यवस्था सावरतेय. या दोन निर्णयांमुळे देशांतर्गत वस्तूंच्या विक्रीचं प्रमाण वाढलंय,' असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं अहवालात नमूद केलंय. भारतातील ग्राहक मूल्य निर्देशांक नियंत्रणात राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केलाय. वाढत्या महागाईचा विचार करुन रिझर्व्ह बँकेनं सतर्क राहून धोरणांची आखणी करावी, असा सल्लादेखील अहवालातून आलाय.
2017 मध्ये ग्राहक मूल्य निर्देशांकात 3.6 टक्क्यांनी वाढ झाली. 2018 आणि 2019 मध्ये हा निर्देशांक 5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. 2017-18 मध्ये महसुली तूट वाढण्याची भीती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केलीय. मात्र परकीय गुंतवणुकीमुळे यामध्ये किंचित वाढ होईल, असा उल्लेखदेखील अहवालात आहे. भारतानंतर दक्षिण आशियात बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेचा क्रमांक असेल. 2018 आणि 2019 मध्ये बांगलादेशची अर्थव्यवस्था 7 टक्क्यांनी वाढेल, असं अहवाल सांगतो. यानंतर श्रीलंका आणि नेपाळचा क्रमांक लागतो.