T20 WC: सीमेवर पाकच्या कुरापती वाढल्या, भारत-पाक सामना रद्द करण्याची मागणी; भाजप मंत्र्याचाही पाठिंबा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 06:27 PM2021-10-17T18:27:09+5:302021-10-17T18:30:02+5:30

T20 World Cup 2021, India vs Pakistan Match: जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापतींमुळे गेल्या आठवड्याभरात भारतीय सैन्याचे नऊ जवान शहीद झाले आहेत.

india vs pakistan match cancel jammu kashmir terror attacks t20 world cup | T20 WC: सीमेवर पाकच्या कुरापती वाढल्या, भारत-पाक सामना रद्द करण्याची मागणी; भाजप मंत्र्याचाही पाठिंबा 

T20 WC: सीमेवर पाकच्या कुरापती वाढल्या, भारत-पाक सामना रद्द करण्याची मागणी; भाजप मंत्र्याचाही पाठिंबा 

Next

T20 World Cup 2021, India vs Pakistan Match: जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापतींमुळे गेल्या आठवड्याभरात भारतीय सैन्याचे नऊ जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानकडून वारंवार भारतीय हद्दीत घुसखोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे सीमेवर अनेकदा चकमकी उडत आहेत. दहशतवाद्यांकडून जम्म-काश्मीरमधील सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये नुकतंच दहशतवाद्यांनी एका पाणीपुरी विक्रेत्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यात पाणीपुरीवाल्याचा मृत्यू झाला होता. बांका येथील रहिवासी असलेल्या या पाणीपुरीवाल्याच्या वडिलांनी आता ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यात होणारा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. भारत-पाक सामना रद्द व्हायला हवा. पाकिस्तानसोबत कोणताही संबंध ठेवला जाऊ नये. सरकारनं याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच भारत सरकारकडून ५० लाख रुपयांची नुकसान भरपाईची देखील मागणी केली आहे. 

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर मोठं विधान केलं आहे. पाकिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये काहीच सुधारणा होत नसेल. त्यांच्या कुरापती अशाच सुरू असतील तर भारत-पाक क्रिकेट सामना रद्द करण्याबाबतचा याचा विचार करायला हवा, असं गिरीराज सिंह म्हणाले आहेत. पाकिस्तानच्या दहशतवादाचा मुखवटा संपूर्ण जगासमोर उघड झाला आहे आणि याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, असंही ते म्हणाले. राजस्थानच्या जोधपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत त्यांना विचारण्यात आलं असता सिंह यांनी दोन्ही देशांमध्ये सध्याचे ताणलेले संबंध लक्षात घेता सामना रद्द करण्याबाबतचा विचार केला गेला पाहिजे, असं म्हणाले. 

पंजाब सरकारच्या मंत्र्यानंही केली मागणी
दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे कुटुंबियच नव्हे, तर पंजाब सरकारमधील मंत्री परगट सिंग यांनीही भारत-पाक सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. भारत-पाक सामना रद्द केला गेला पाहिजे कारण सीमेवरील परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ होणार नाही याचा काळजी घेत सामना रद्द करण्याची गरज आहे, असं कॅबिनेट मंत्री परगट सिंग म्हणाले. 

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात असून यात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातल्यानंतर भारतीय सैन्यानंही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोठी शोध मोहिम हाती घेतली आहे. दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा केला जात आहे. या मोहिमेत गेल्या आठवड्याभरात ९ भारतीय जवनांना वीरमरण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानबाबत संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. 

Web Title: india vs pakistan match cancel jammu kashmir terror attacks t20 world cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.