सोमवारीच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ऑपरेशन सिंदूर, चांद्रयान मोहिमा या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे संकेत दिले होते. यावर पुढे जात उत्तराखंड सरकारने मदरशांमध्ये नवीन अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ चा धडा जोडला जाणार असल्याची घोषणा केली आहे.
उत्तराखंडमध्ये ४५१ नोंदणीकृत मदरशे आहेत. यात जवळपास ५० हजार हून अधिक विद्यार्थी शिकतात. ऑपरेशन सिंदूरमुळे हे विद्यार्थी लहानपणापासूनच देशप्रेमाचे धडे गिरवणार आहेत. या विद्यार्थ्यांना देशभक्तीने भरलेल्या इतिहासाची ओळख करून दिली जाणार आहे. धामी सरकारचा हा निर्णय राष्ट्रवाद आणि लष्करी अभिमान यांना शिक्षणाशी जोडण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले जात आहे.
या उपक्रमामुळे मुलांचा अशा संशोधनाकडे कल वाढेल ज्यामुळे त्यांची राष्ट्रीय हितांबद्दलची ओढ वाढेल. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात शालेय स्तरापासूनच मुलांमध्ये अशी बीजे रोवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. याचबरोबर केंद्र सरकार चांद्रयानाचाही धडा या अभ्यासक्रमात जोडणार आहे. चांद्रयानासोबतच ऑपरेशन सिंदूर देखील आता लहान मुलांच्या हृदयात आहे. त्यांच्या तोंडी ब्रम्होस, आकाश मिसाईलचे नाव आहे. भारताने पाकिस्तानवर कसा हल्ला केला, आपल्या शूर जवानांनी काय काय पराक्रम केले हे त्यांना आता माहिती होणे गरजेचे आहे. याचा पुढील पिढी घडविण्यासाठी फायदा होणार आहे.
भारताने पाकिस्तानविरोधात तीन युद्धे लढली आहेत. या तिन्ही युद्धांत भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा केला आहे. या इतिहासासोबत भारताचा नवा इतिहासही नव्या पिढीला शिकविण्याची गरज आहे. सध्याचे ऑपरेशन सिंदूर या लहान मुलांच्या मनात आहे, यामुळे ते याचा अभ्यास अधिक गोडीने करतील अशी अपेक्षा शिक्षण तज्ञांना वाटत आहे.