ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:12 IST2025-12-12T12:11:58+5:302025-12-12T12:12:38+5:30
India Russia Missile: पुढील 12 ते 18 महिन्यांत वायुसेनेला या क्षेपणास्त्रांचा पुरवठा सुरू होऊ शकतो.

ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
India-Russia : भारतीय वायुसेनेची ताकद आणखी वाढणार आहे. भारताचारशियासोबत लांब पल्ल्याच्या R-37M हायपरसोनिक एअर-टू-एअर मिसाइलच्या खरेदीसाठी होणारा व्यवहार अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. या करारात 300 पेक्षा जास्त मिसाइलांचा समावेश असून, पुढील 12 ते 18 महिन्यांत वायुसेनेला त्यांचा पुरवठा सुरू होऊ शकतो.
वायुसेनेला नवी धार
भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात सध्या ब्रह्मोससारखे प्रगत मिसाइल उपलब्ध आहेत. आता मिळणारी R-37M मिसाइल वायुसेनेची एयर-टू-एअर मारक क्षमता अनेक पटींनी वाढवणार आहे. 300 किलोमीटरपेक्षा जास्त मारक अंतर आणि मॅक 6 (सुमारे 7,400 किमी/ता) वेगाने उडणारे हे क्षेपणास्त्र जगातील सर्वात लांब पल्ल्याच्या एअर-टू-एअर मिसाइलपैकी एक मानले जाते. AWACS, एअर-टँकर आणि इतर हाय-व्हॅल्यू टार्गेट्स क्षणार्धात नष्ट करण्याची क्षमता यात आहे.
प्रगत तंत्रज्ञानाची साथ
R-37M ही मिसाइल विशेषतः Su-30MKI आणि Su-30SM सारख्या वेगवान व मोठ्या फाइटर जेट्ससाठी डिझाइन करण्यात आली आहे. यात अॅक्टिव्ह रडार सीकर बसवले आहे, जे टार्गेटला अंतिम क्षणापर्यंत लॉक ठेवते. 60 किलो क्षमतेचा वॉरहेड हाय-व्हॅल्यू टार्गेट्सना पूर्णपणे नष्ट करण्यास सक्षम आहे.
Su-30MKI मध्ये सहज बसवता येते
Su-30MKI आणि रशियन Su-30SM ही एकाच श्रेणीतील विमाने असल्याने R-37M मिसाइल भारतीय फाइटर जेटमध्ये बसवण्यासाठी मोठ्या बदलांची आवश्यकता नाही. फक्त मिशन कॉम्प्युटर आणि BARS रडारमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेड केल्यानंतर ही मिसाइल पूर्ण क्षमतेने कार्यशील होऊ शकते. प्रत्येक Su-30MKI वर दोन R-37M मिसाइल बसवण्याची योजना आहे.
शत्रुंच्या AWACSवर थेट प्रहार
ही मिसाइल मुख्यतः अशा प्लॅटफॉर्म्सना लक्ष्य करण्यासाठी तयार करण्यात आली आहे ज्यामुळे युद्धाचे चित्र बदलू शकते. AWACS, एअर-टँकर्स आणि जॅमिंग प्लॅटफॉर्म्स यांना दूरूनच नष्ट करण्याची क्षमता भारताला मिळणार आहे. म्हणजेच शत्रूची ‘डोळे आणि कान’ असलेली प्रणाली युद्धक्षेत्रात प्रवेश करण्याआधीच ध्वस्त केल्या जाऊ शकतात.
ब्रह्मोस: भारत-रशिया भागीदारीचे शक्तिशाली प्रतीक
भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेली ब्रह्मोस मिसाइल प्रणाली आधीच जगातील सर्वोत्कृष्ट सुपरसोनिक क्रूझ मिसाइलमध्ये गणली जाते. ब्रह्मपुत्र आणि मोस्कवा या नद्यांवरून या मिसाइलचे नाव ठेवण्यात आले असून ही दोन देशांच्या तांत्रिक एकतेची निशाणी आहे.
रेंज आणि गती
ब्रह्मोस जमिनीवरून, समुद्रातून आणि हवेतून प्रक्षेपित केली जाऊ शकते. सध्याची रेंज सुमारे 450 किमी, तर अपग्रेडेड व्हर्जनची रेंज 800 किमी करण्यात येत आहे. मॅक 2.8 (सुमारे 3,700 किमी/ता) वेगाने ही मिसाइल लक्ष्य भेदते.
विनाशक क्षमता
ब्रह्मोसमध्ये 200 ते 300 किलो वजनाचा हाय-एक्सप्लोसिव्ह वॉरहेड बसवला जातो. बंकर, सैन्य तळ, जहाजे किंवा मिसाइल लाँच स्टेशन यांसारखी कठीण लक्ष्ये क्षणात नष्ट करण्याची तिची क्षमता आहे. ब्रह्मोस आणि R-37M या दोन्ही प्रगत प्रणालींमुळे भारताची हवाई संरक्षण क्षमता जगातील अत्याधुनिक देशांच्या बरोबरीने येणार आहे.