पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 06:07 IST2025-07-27T06:07:24+5:302025-07-27T06:07:55+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या यादीत आठव्या क्रमांकावर असून, त्यांना ४४ टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला. पंतप्रधान मोदींचे किती टक्के लोकांनी समर्थन केले?

पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सन २०१४, २०१९ आणि २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतलेले नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा ‘जगातील सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यां’मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या अमेरिकेतील नामांकित संशोधन संस्थेने या संदर्भातील सर्वेक्षण केले असून, त्यात तब्बल ७५ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर मोहोर उमटवली; तर १८ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीला विरोध केला आणि सात टक्के लोकांनी कोणतेही मत व्यक्त केले नाही.
पंतप्रधान मोदींनंतर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग आणि अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेव्हिअर मिलेई अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने अनेक देशांतील नागरिकांच्या प्रतिक्रियांद्वारे हे सर्वेक्षण केले आहे. दरम्यान, भाजपचे आयटी सेलप्रमुख अमित मालवीय यांनी ‘एक्स’वर मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणाचे तपशील शेअर करत म्हटले की, १०० कोटींपेक्षा अधिक भारतीयांचा विश्वास आणि जगातील लक्षावधी नागरिकांनी सन्मान केल्याने मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वांत लोकप्रिय व विश्वासार्ह नेते ठरले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प घसरले आठव्या क्रमांकावर
दरम्यान, ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या यादीत आठव्या क्रमांकावर असून त्यांना ४४ टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. जागतिक स्तरावरील आणि देशांतर्गत धोरणांमुळे त्यांच्या लोकप्रियतेवर परिणाम झाल्याचे मानले जाते. यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी असून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ऍन्थनी अल्बानिज पाचव्या क्रमांकावर आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी दहाव्या क्रमांकावर आहेत.
मोदींनी इंदिरा गांधी यांचा विक्रमही काढला मोडीत
दरम्यान, याच आठवड्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रमदेखील मोडला आहे. सलग ४०७८ दिवस पंतप्रधान पदावर कार्यरत राहून त्यांनी इंदिरा गांधींच्या सलग ४०७७ दिवसांच्या कार्यकाळाचा विक्रम मोडला.