नवी दिल्ली - पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. या मोहिमेत भारताने पाकिस्तानातीलदहशतवादी तळांना टार्गेट केले. त्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. रात्री अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली. मात्र हा एअर स्ट्राइक रात्री दीड वाजताच का करण्यात आला याबाबतचा खुलासा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी केला आहे. रांची येथील एका शाळेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जनरल अनिल चौहान म्हणाले की, ७ मे रोजी रात्री १ ते दीड या काळात दहशतवादी तळांवर पहिला स्ट्राइक करण्यात आला होता. ही वेळ निवडण्यासाठी २ कारणे होती. पहिले कारण म्हणजे, सैन्याला त्यांच्या तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्तेवर विश्वास होता. रात्रीही ते इमेजरी अथवा सॅटेलाईट फोटो घेऊ शकतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तिथल्या सामान्य नागरिकांचा जीव वाचवणे. जर ही स्ट्राइक पहाटे ५.३०-६ च्या सुमारास झाली असती तर ही पहिल्या नमाजाची वेळ होती. त्यामुळे बहावलपूर, मुरिदके येथे बहुसंख्य नागरिक नमाजासाठी घराबाहेर पडले असते. त्यात नागरिकांना नुकसान होण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे मध्यरात्री १ ते दीड च्या काळात स्ट्राइक करण्यात आले असं त्यांनी सांगितले.
तसेच रात्रीच्या वेळीही इतक्या लांब अंतरावरील टार्गेटवर प्रिसिजन स्ट्राइक केला जाऊ शकतो हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले. तंत्रज्ञान, सिग्नल इंटेलिजेंस, इमेजरी चांगली हवी. ही रणनीती ना सैन्याचा धोका कमी करण्यासाठी गरजेचे होती तर नागरिकांच्या सुरक्षेसाठीही महत्त्वाची होती. सैन्य केवळ ताकद नाही, तर प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि देशभक्तीचं प्रतीक आहे असंही जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं.
दरम्यान, सैन्य ही फक्त अशी जागा आहे जिथे नेपोटिज्म होत नाही. जिथे व्यक्तीची पात्रता केवळ कामावर ठरते, ना कुठल्याही कनेक्शन अथवा संबंधाशिवाय..यावर्षी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संकट आली. त्यात सैन्याने नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारी जागरूक करण्याचं काम युवकांनी केले पाहिजे असं आवाहन जनरल चौहान यांनी तरुणांना केले.