भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 06:27 IST2025-07-31T06:25:04+5:302025-07-31T06:27:51+5:30
राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या विशेष चर्चेत एस. जयशंकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून कोणतीही चर्चा झालेली नाही.

भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप केला नाही. ही लष्करी कारवाई स्थगित करण्याचा व व्यापारी संबंधांच्या मुद्द्याचा काहीही संबंध नव्हता, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत बुधवारी स्पष्टपणे सांगितले. भारत व पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी घडवून आणण्यात अमेरिकेचा महत्त्वाचा सहभाग होता हा त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा केलेला दावा अशा रीतीने केंद्र सरकारने खोडून काढला आहे.
राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या विशेष चर्चेत एस. जयशंकर म्हणाले की, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तसेच १६ जूनदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून कोणतीही चर्चा झालेली नाही.
‘ट्रम्प यांना खोटे ठरविल्यास ते सत्य उघड करतील ही केंद्राला भीती’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजूनही स्पष्टपणे सांगितलेले नाही. कारण त्यांनी तसे म्हटले तर ट्रम्प खरे काय घडले ते उघडपणे सांगतील, अशी भीती केंद्र सरकारला वाटते, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ट्रम्प खोटे बोलत आहेत असे मोदी यांनी म्हटलेले नाही. ते असे का करत आहेत याचे कारण सर्वांनाच माहीत आहे. टॅरिफमध्ये दबाव आणण्यासाठी ट्रम्प अशी वक्तव्ये करत आहेत.
हल्ल्याने अनेक महिलांचे सिंदूर पुसले गेले, पण…
पहलगाम हल्ल्यामध्ये अनेक महिला विधवा झाल्या. त्यांचे सिंदूर पुसले गेले. तरीही पाकवर केलेल्या कारवाईला केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर असे नाव का दिले असा सवाल समाजवादी पक्षाच्या खासदार व अभिनेत्री जया बच्चन यांनी राज्यसभेत बुधवारी विचारला. ऑपरेशन सिंदूरवर या सभागृहात सुरू असलेल्या विशेष चर्चेत त्यांनी हे वक्तव्य केले.
महाराष्ट्रातील खासदार…
डॉ. मेधा कुलकर्णी (भाजप ) : जवानांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, विरोधक त्यांच्या पराक्रमावर प्रश्न उपस्थित करीत आहेत.
संजय राऊत (उद्धवसेना) : 'ऑपरेशन सिंदूर'ची कारवाई थांबविण्याच्या बदल्यात पाकच्या तुरूंगात बंद कुलभूषण जाधव यांची सुटका करून घ्यायला हवी होती.
फौजिया खान (श.प. गट) : सरकारकडे हल्ला होण्याची गुप्त सूचना होती. यानंतरही हल्ला झाला.
अशोक चव्हाण (भाजप) : विरोधकांना सैन्याच्या जवानांवर विश्वास नाही. विरोधक नेमका कोणता संदेश जगाला देण्याचा प्रयत्न करीत आहेत.