India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 06:03 IST2025-05-06T06:02:51+5:302025-05-06T06:03:18+5:30

युद्धासाठी पूर्ण सज्ज व्हा आणि युद्धकाळातील उपायांचा सराव करा; सर्व राज्यांना केंद्र सरकारचे निर्देश

India-Pakistan War: ‘Mock drill’ of war preparedness in the country tomorrow; Siren, practice of saving civilians | India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानशी निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने अनेक राज्यांनाही युद्धसज्जतेच्या दृष्टीने ७ मे रोजी ‘मॉक ड्रिल’ अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले.

सूत्रांनुसार, या सरावादरम्यान संभाव्य हवाई हल्ल्यांचा इशारा देणाऱ्या सायरनचा सराव तसेच कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यावेळी स्वत:चा बचाव कसा करायचा यासंबंधी सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांना प्रशिक्षण देण्यासारख्या उपाययोजनांचा यात समावेश आहे. संभाव्य गंभीर परिस्थिती लक्षात घेता अगदीच अटीतटीच्या काळात ‘ब्लॅकआऊट’ करण्याचा उपाय असो अथवा प्रमुख प्रकल्प, प्रतिष्ठित संस्थांसह इतर केंद्रांच्या संरक्षणाच्या उपायांचाही या सरावात समावेश असेल. वित्तीय शिस्तीसाठी असलेल्या योजनांच्या आधुनिकीकरणासह त्याचा सराव करण्याचे निर्देशही केंद्राने अशा राज्यांना दिले आहेत.

भारताच्या डिफेन्स वेबसाइटवर पाकचा सायबर हल्ल्याचा प्रयत्न
पाकिस्तानी हॅकर्स भारतीय वेबसाईट्सला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पाकिस्तान सायबर फोर्स नामक एका एक्स हँडलने दावा केला की, त्याने मिलिट्री इंजिनिअर सर्विहेस आणि मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड  ॲनालिसिसच्या संवेदनशील डेटापर्यंत जाण्यात यश मिळवले आहे.
सूत्रांनी सांगितले की, संरक्षण मंत्रालयांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आर्मर्ड व्हेईकल निगम लिमिटेडच्या वेबसाईटला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. वेबसाईट ऑफलाईन करण्यात आली आहे. 

पाकिस्तान सायबर फोर्स हँडलला आता रोखण्यात आले आहे. त्याने आर्मर्ड व्हेईकल निगम लिमिटेडच्या वेबपेजचे छायाचित्र पोस्ट केले होते. तेथे भारतीय रणगाड्याच्या जागी पाकिस्तानी रणगाडा लावला होता. अन्य एका वेबसाईटवरील १,६०० वापरकर्त्यांचा १० जीबी डेटा मिळवला आहे, असा दावाही हँडलरकडून करण्यात आला होता.

रशिया भारताच्या पाठीशी
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशिया भक्कमपणे भारताच्या पाठीशी असल्याची हमी त्यांनी दिली. पहलगाम हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर शासन करून न्याय व्हायलाच हवा, असे पुतिन म्हणाले.

Web Title: India-Pakistan War: ‘Mock drill’ of war preparedness in the country tomorrow; Siren, practice of saving civilians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.