जैसलमेर - पाकिस्तानकडूनभारताच्या सीमाभागातील शहरांवर गुरुवारी रात्री ड्रोन, मिसाईल हल्ले करण्यात आले. या हल्ल्याला भारतीय सैन्यानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने शत्रू देशाकडून येणारे प्रत्येक ड्रोन, मिसाईल हवेतच उद्ध्वस्त केले. शुक्रवारी सकाळी जैसलमेरच्या किशनघाट परिसरात रात्री केलेल्या हल्ल्यातील एक बॉम्ब सापडला आहे. नागरी वस्तीत आढळलेल्या या बॉम्बने खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एअरफोर्सची टीम तातडीने घटनास्थळी पोहचली आणि संपूर्ण परिसर सील केला.
वस्तीत बॉम्ब अन् सूली डुंगर भागात ड्रोनचा मलबा
जैसलमेर शहरातील सूली डुंगर भागात पाकिस्तानी ड्रोनचा मलबा सापडला. रात्री उशिरा आर्मी जवान हा मलबा सोबत घेऊन गेले. स्थानिक रहिवासी आणि प्रत्यक्षदर्शी अर्जुन नाथ यांनी सर्वात आधी संशयास्पद वस्तू पाहिली. त्यानंतर त्यांनी किशनघाटच्या संरपंचांना याची माहिती दिली. सरपंच कल्याणराम यांनी तात्काळ कंट्रोल रूमला फोन करून पोलिसांना सूचना दिली. ज्यानंतर सुरक्षा यंत्रणेचे पथक तिथे पोहचले. पोलिसांसोबत हवाई दलाची टीमही घटनास्थळी पोहचली. संभाव्य धोका पाहता तिथला परिसर रिकामा करण्यात आला. घटनास्थळी बॉम्बविरोधी पथक बोलावले.
जिवंत बॉम्ब असण्याची शक्यता
विभागीय सूत्रांनुसार, जप्त करण्यात आलेली वस्तू जिवंत बॉम्ब असण्याची शक्यता आहे. सुरक्षा पथकाकडून कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली. गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास जैसलमेर येथे पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. सुरक्षा पथक या घटनेचा तपास करत असून या भागात पोलिसांनी अतिरिक्त तुकडी तैनात केली आहे.