India-Pakistan Tension: भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्याबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांचा निषेध केला आणि म्हटले की, युद्ध हे रोमँटिक चित्रपट नाही, तर एक गंभीर मुद्दा आहे. आदेश मिळाल्यास ते युद्धासाठी तयार आहेत, परंतु मुत्सद्देगिरी ही त्यांची पहिली पसंती असेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना मनोज नरवणे म्हणतात, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्यासाठी ते कायमचे दुःख बनते. PTSD (पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) नावाचा एक आजार देखील आहे. ज्यांनी भयानक दृश्ये पाहिली, आहेत त्यांना 20 वर्षांनंतरही घाम फुटतो आणि मानसोपचारतज्ज्ञाची आवश्यकता भासते. युद्ध हे रोमँटिक बॉलिवूड युद्धासारखे नाही, ते एक खूप गंभीर मुद्दा आहे. युद्ध किंवा हिंसाचार हा शेवटचा उपाय असला पाहिजे, म्हणूनच आपले पंतप्रधान म्हणाले की, हे युद्धाचे युग नाहीये. मूर्ख लोक आपल्यावर युद्ध लादण्याचा प्रयत्न करतील, पण आपण त्याचे स्वागत करू नये.
माजी लष्करप्रमुख पुढे म्हणाले, काही लोक विचारत आहेत की, आपण पूर्ण युद्ध का केले नाही? आदेश मिळाला तर मीदेखील युद्धात जाईन, पण युद्ध माझी पहिली पसंती नसेल. माझी पहिली पसंती मुत्सद्देगिरीला आहे. संवादाद्वारे मतभेद सोडवणे आणि सशस्त्र संघर्षाच्या टप्प्यावर न पोहोचणे, ही आपली प्राथमिकता असायला हवी. राष्ट्रीय सुरक्षेत आपण सर्व समान भागीदार आहोत. आपण केवळ देशांमधीलच नव्हे तर आपल्यातील मतभेदही सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मग ते कुटुंबांमध्ये असोत किंवा राज्ये, प्रदेश आणि समुदायांमध्ये असोत. हिंसाचार हा उपाय नाही, असेही मनोज नरवणे यांनी यावेळी म्हटले.