भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 08:42 IST2025-05-18T08:40:58+5:302025-05-18T08:42:03+5:30
एहसान उर रहिम उर्फ दानिश भारतात राहून देशाविरोधात षडयंत्र रचत होता. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी ज्योती आणि दानिशची भेट गंभीर मानत तपासाला सुरुवात केली.

भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
नवी दिल्ली - पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपात हरियाणातील एक युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली आहे. ज्योती मल्होत्राला पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या भेटीप्रकरणी शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले. जिथे तिला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
माहितीनुसार, पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात तैनात पाकिस्तानी कर्मचारी एहसान उर रहिम उर्फ दानिशने ज्योती मल्होत्राला डिनरसाठी बोलावले होते. या दोघांमध्ये बोलणे झाले. युट्यूबरने त्याच्यासोबत एक व्हिडिओही रेकॉर्ड केला. त्यानंतर दानिश आणि त्याचा सहकारी अली एहसान याने ज्योतीची पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यासोबत भेट घडवली. ज्योतीने जट्ट रंधावा नावाने सेव्ह केलेल्या पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी शाकीर उर्फ राणा शाहबाजसोबत व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटवर बोलणे केले. ज्योतीवर भारतीय दंड संहिता १५२ आणि ऑफिसियल सीक्रेट्स कायदा १९२३ मधील कलम ३,४ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
एहसान उर रहिम उर्फ दानिश भारतात राहून देशाविरोधात षडयंत्र रचत होता. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी ज्योती आणि दानिशची भेट गंभीर मानत तपासाला सुरुवात केली. आता कोर्टाने सुनावलेल्या पोलीस कोठडीनंतर ज्योती दानिशला का भेटली, त्यांच्यात काय बोलणे झाले याची चौकशी करणार आहे. ज्योतीचं यू्ट्यूब चॅनेल आहे ज्याला ३ लाखाहून अधिक सब्सक्राइबर आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर १.३२ लाख फॉलोअर्स आहेत. ज्योतीच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून ती भारतासह अनेक देशात गेल्याचे दिसून येते. ज्यात इंडोनेशिया आणि चीनचाही समावेश आहे परंतु सुरक्षा यंत्रणाची नजर तिच्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. ज्याचे व्हिडिओ तिने २ महिन्यापूर्वी पोस्ट केले होते.
या व्हिडिओत ज्योती अटारी-वाघा बॉर्डर क्रॉस करून लाहोरच्या अनारकली बाजारात फिरताना दिसते, बस प्रवास करते, पाकिस्तानातील सर्वात मोठं हिंदू मंदिर कटासराज मंदिरात दर्शनासाठी जाते. ज्योती मल्होत्राला पाक एजेंटने तिच्या या व्हिडिओवरून निवडले. ज्यातून पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा बनवणारे तिने व्हिडिओ केले. ज्योतीसह इतर ६ जणांना अटक करण्यात आली आहे. ज्यांच्यावर संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप आहे.