India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 09:39 IST2025-05-06T09:36:10+5:302025-05-06T09:39:35+5:30
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. भारताच्या भूमिकेनंतर पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरू झाल्या आहेत. सलग १२व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधी धुडकावून लावण्यात आली.

India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
India Pakistan News Marathi: पहलगामजवळ असलेल्या बैसरन पठारावर दहशतवादी हल्ला झाला. तेव्हापासून भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असून, पाकिस्तानकडून सीमेपलिकडून कुरापती केल्या जात आहे. २२ एप्रिलपासून पाकिस्तान लष्कराकडून सातत्याने भारतीय लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार केला जात आहे. इतर ठिकाणीही शस्त्रसंधींचं पाकिस्तानकडून उल्लंघन केलं जात आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर दिलं जात असलं, तरी पाकिस्तानच्या कुरघोड्या थांबत नसल्याची स्थिती आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या घटनेला आता १२ दिवस लोटले आहेत. त्यानंतर सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने दहशतवादाविरोधात कारवाई सुरू केली आहे. पण, दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराकडूनच सीमेपलीकडून शस्त्रसंधीला वाकुल्या दाखवण्याचे काम सुरू आहे.
पाकिस्तानी लष्कराकडून कुठे गोळीबार करण्यात आला?
जम्मूतील सीमेलगत असलेल्या पुंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी, अखनूर या भागात, तर काश्मीरमधील बारामुला सेक्टरमध्ये सीमेवर शस्त्रसंधीचं पाकिस्तानी लष्कराने उल्लंघन केले.
वाचा >>देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव
पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर भारतीय लष्करानेही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. पाकिस्तान लष्कराकडून सलग १२ व्या दिवशी गोळीबार करण्यात आला आहे.
भारताकडून पाकिस्तानची कोंडी
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी पावले उचलली आहेत. पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार भारताने स्थगित केला आहे. इतकं नाही, तर वाघा-अटारी सीमाही बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना परत पाठवण्याची कारवाई सुरू आहे.
भारताने पाकिस्तानसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानसोबतचा व्यापारही थांबवला आहे. पाकिस्तान भारत यांच्यातील टपाल सेवाही बंद करण्यात आली आहे.