भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:18 IST2025-05-06T16:17:46+5:302025-05-06T16:18:38+5:30
केंद्र सरकारने उद्या 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित केले आहे.

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
Delhi police LRAD system: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने तयारी तीव्र केली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, उद्या (बुधवार, 7 मे) देशातील 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित केले आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात तर गेल्या काही दिवसांपासून सैन्य सराव सुरू आहेत. अशातच, देशाची राजधानी नवी दिल्ली येथील पोलिस मुख्यालयात एलआरएडी (लाँग रेंज अकॉस्टिक डिव्हाइस) प्रणाली तैनात करण्यात आली आहे.
एलआरएडी प्रणाली म्हणजे काय?
एलआरएडी हे एक विशेष प्रकारचे ध्वनी-आधारित उपकरण आहे. लोकांना सतर्क करण्यासाठी याचा वापर केला जातो. एलआरएडी खूप मोठा आवाज निर्माण करतो, जो 500 मीटर ते एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत ऐकू येतो. अचानक हल्ला झाल्यास LRAD एक शक्तिशाली सायरन म्हणून काम करतो. याचा उपयोग गर्दीला सावध करण्यासाठी आणि जनतेला आपत्कालीन संदेश देण्यासाठी केला जातो.
VIDEO | LRAD System brought to Delhi Police Headquarters. Delhi Police officials were given a detailed briefing on how the system works. This device will be used to emit loud sirens and deliver messages to disperse crowds in case of a sudden attack.
— Press Trust of India (@PTI_News) May 6, 2025
(Full video available on PTI… pic.twitter.com/v5wJKlCIYd
भारत सज्ज, पंतप्रधान मोदींची लष्करप्रमुखांसोबत बैठक
बालाकोट हल्ल्यानंतर खोल समुद्रातील चाचणी आणि सुधारित क्षमतांसह भारत प्रत्येक आघाडीवर आपली लष्करी तयारी मजबूत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिन्ही सैन्य प्रमुख आणि इतर अधिकाऱ्यांसोबत तयारीचा सतत आढावा घेत आहेत. तसेच, सरकारने सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.
अखनूरमध्ये बंकर तयार
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमधील सीमावर्ती गावातील लोक तयारी करत आहेत. सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराच्या भीतीने, गावकरी भूमिगत बंकर साफ करत आहेत आणि त्यात अन्नपदार्थ आणि साठवून ठेवत आहेत. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी ही तयारी सुरू आहे.
सीमावर्ती भागात काय व्यवस्था आहे?
जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात गेल्या काही दिवसांपासून सराव सुरू आहेत. श्रीनगरमधील झेलम नदीच्या काठावर एसडीआरएफने बचाव कार्य केले. युद्धसदृश परिस्थिती उद्भवल्यास त्यांना कसे प्रतिसाद द्यायचे याचे प्रशिक्षण देणे हा या मॉक ड्रिलचा उद्देश आहे. हवाई हल्ले किंवा क्षेपणास्त्र हल्ले यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना जगण्याच्या पद्धती शिकवल्या जात आहेत.