आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:27 IST2025-05-08T15:19:52+5:302025-05-08T15:27:21+5:30
भारतातील निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकण्यासाठी भारताने पुन्हा एकदा चिनाबचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
भारतातील निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकण्यासाठी भारताने पुन्हा एकदा चिनाबचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. बगलिहार आणि सलाल धरणाचे दरवाजे गरुवारी उघडण्यात आले आहेत. यामुळे आता पाकिस्तानमधील वेगवेगळ्या भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
सीमावर्ती भागातील त्यांच्या लष्करी कारवायांवरही याचा परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांत भारताने पाकवर पाणी हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे. रविवारी याआधी भारत सरकारने चिनाब नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबवला होता, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यांचे विविध जलविद्युत प्रकल्प बंद करण्यात आले होते. मात्र, भारताने दुसऱ्या दिवशी पाणी सोडले. ऑपरेशन सिंदूरमुळे निराश झालेल्या पाकिस्तानने मंगळवारी रात्रीपासून भारताच्या सीमावर्ती भागात गोळीबार सुरू केला आहे. या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून, १४ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
या हल्ल्यात जवळपास १०० नागरिक जखमी झाले आहेत. संबंधित सूत्रांनी सांगितले की, काल रात्री रियासीच्या दोडा-किश्तवारमध्ये मुसळधार पाऊस पडला. यामुळेच, बगलियार आणि सलाल धरणातील पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी बांधलेले दोन अतिरिक्त दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे रियासीच्या खाली अखनूरमध्ये पाण्याची पातळी २० फुटांपेक्षा जास्त वाढली आहे.
पाकिस्तानात पाणीच पाणी!
यामुळे अखनूरच्या खाली असलेल्या पाकिस्तानी भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. याची अद्याप पुष्टी झालेली नसली तरी, सूत्रांनी सांगितले की चिनाब पाणलोट क्षेत्रात असलेल्या गढखल आणि परगवाल सेक्टरमधील काही पाकिस्तानी चौक्या पाण्याखाली गेल्या आहेत.
सिंधू पाणी करारांतर्गत, चिनाब नदीचे पाणी रोखण्यापूर्वी किंवा त्यावर बांधलेल्या धरणांमधून अचानक पाणी सोडण्यापूर्वी पाकिस्तानला माहिती देण्यात येत होती. आता हा करार स्थगित करण्यात आला आहे, त्यामुळे आता त्याची माहिती पाकला दिली जाणार नाही. आता भारत जेव्हा हवे, तेव्हा पाकिस्तानमध्ये दुष्काळ आणि पूर परिस्थिती निर्माण करू शकतो.