अमेरिकेच्या दबावाला रशियानं झुगारलं, मित्र भारताची परीक्षा घेणार; ट्रम्प आणखी भडकणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:28 IST2025-01-29T16:27:41+5:302025-01-29T16:28:30+5:30
अमेरिकेच्या निर्बंधानंतरही रशियावर फार काही परिणाम झाला नाही. तेल पुरवठा सुरूच राहिला. रशिया तेल स्वेज कालव्याच्या मार्गे भारतात येत आहे.

अमेरिकेच्या दबावाला रशियानं झुगारलं, मित्र भारताची परीक्षा घेणार; ट्रम्प आणखी भडकणार?
मॉस्को - युक्रेन युद्धामुळे अमेरिकेच्या बायडन प्रशासनाने जाता जाता रशियाविरोधात लावलेले निर्बंध आणखी कठोर केले होते. अमेरिकेने रशियाच्या तेल निर्यातीवर अनेक निर्बंध लावले ज्यामुळे भारतासमोर संकट निर्माण झाले. त्यानंतरही आता रशियाने कमीत कमी ५ तेल टँकर भारतासाठी रवाना केले आहेत. रशियाकडून ब्लॅकलिस्ट केलेले हे टँकर भारतासाठी समस्या बनली आहे. जर कुणी १० जानेवारीच्या आधी जहाज लोड केले असेल तर त्याला भारतीय बंदरावर उतरवलं जाईल असं भारताने म्हटलं आहे. रशियाने जे नवीन तेल टँकर पाठवलेत त्यात भारताला अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.
बायडन यांनी त्याच्या कार्यकाळातील शेवटच्या दिवसात १० जानेवारीला रशियाविरोधात निर्बंधांची घोषणा केली होती. रशियातून हे सर्व ५ तेल टँकर याच दिवशी रवाना झाले होते. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, रशियाचे हे पाऊल मॉस्को आणि नवी दिल्ली यांची परीक्षा घेणारं आहे. पश्चिमेकडील देशांचे लक्ष युक्रेन युद्धावरून रशियाची कोंडी करण्याकडे आहे. अमेरिकेच्या निर्बंधानंतरही रशियावर फार काही परिणाम झाला नाही. तेल पुरवठा सुरूच राहिला. रशिया तेल स्वेज कालव्याच्या मार्गे भारतात येत आहे.
युक्रेन युद्धात रशियाला झुकवण्याची ट्रम्प यांची इच्छा
युक्रेन युद्धाच्या काळात तेलाची विक्री रशियासाठी लाईफलाईन बनली आहे. अमेरिकन कारवाईनं तेलाच्या पुरवठ्यावर वाईट परिणाम होईल असं अनेक विश्लेषकांचे म्हणणं आहे. यातच रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, चीन आणि भारताने मार्चसाठी रशियन तेल खरेदी थांबवली आहे कारण रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे शिपिंगचा खर्च खूप वाढला आहे. यापूर्वी अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने रशियाच्या १८३ जहाजांना लक्ष्य केले होते आणि विविध प्रकारचे कठोर निर्बंध लागू केले होते.
दरम्यान, रशियाचं उत्पन्न कमी व्हावे जेणेकरून ते चर्चेला तयार होतील असं अमेरिकेला वाटते. डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता सांभाळताच पुतिन यांच्यावर चर्चेसाठी दबाव वाढवला आहे. मी ट्रम्प यांना भेटायला तयार आहे असं पुतिन यांनी अलीकडेच म्हटलं होते तर जर पुतिन चर्चा करणार नसतील तर रशियाविरोधात आणखी जास्त निर्बंध लावले जातील असा इशारा ट्रम्प यांनी दिला. मी सत्तेत येताच युक्रेनविरोधातील युद्ध बंद करायला लावेन असं आश्वासन ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात दिले होते. त्यात भारत जर रशियाकडून तेल खरेदी करत राहिला तर अमेरिका आणि भारताचे संबंध खराब होतील असं तज्ज्ञांना वाटते.