भारत गरीब लोकांचा श्रीमंत देश, नितीन गडकरी यांचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 13:25 IST2022-09-30T13:24:43+5:302022-09-30T13:25:00+5:30
नागरिक गरिबी, उपासमार, बेरोजगारी व महागाईने त्रस्त असल्याचं व्यक्त केलं मत

भारत गरीब लोकांचा श्रीमंत देश, नितीन गडकरी यांचं वक्तव्य
नागपूर/नवी दिल्ली : भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आणि समृद्ध देश असूनही येथील लोकसंख्या गरिबी, उपासमार, बेरोजगारी, जातिवाद, अस्पृश्यता आणि महागाईचा सामना करीत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी म्हटले आहे.
नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, देशात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत चालली आहे, ती भरून काढण्याची गरज आहे. आपण गरीब लोकसंख्या असलेला श्रीमंत देश आहोत. आपला देश समृद्ध आहे, पण तेथील लोकसंख्या गरीब आहे जी उपासमार, बेरोजगारी, महागाई, जातिवाद, अस्पृश्यता आणि इतर अनेक समस्यांना तोंड देत आहे जे समाजाच्या प्रगतीसाठी चांगले नाही.
ग्रामीण भागात संधींचा अभाव
आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रात काम करण्याची गरज असल्याचे सांगून ते म्हणाले की, देशातील १२४ जिल्हे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्याच्या बाबतीत मागे आहेत. देशात शहरी भागात खूप विकास झाला आहे; मात्र ग्रामीण भागात सुविधा आणि संधींचा अभाव असल्याने मोठी लोकसंख्या शहरांकडे स्थलांतरित होत आहे.
कमी पगार अन् महागाईने मंदी
वाढती महागाई आणि पगारात सतत कपात झाल्याने मंदीची भीती वाढली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील आघाडीच्या अर्थतज्ज्ञांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. भारताने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.