भारत अवैध सोन्याच्या आयातीचे प्रमुख केंद्र; एक वर्षात १,३१९ किलो सोने जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 09:40 IST2025-02-10T09:39:56+5:302025-02-10T09:40:33+5:30
वाई मार्गाने सोन्याची तस्करी हे भारतातील प्रमुख माध्यम आहे. अलीकडे, नैरोबी आणि अदिस अबाबासारखी आफ्रिकन विमानतळे, तसेच ताश्कंदसारखी विमानतळे ही तस्करीची प्रमुख ठिकाणे म्हणून समोर आली आहेत.

भारत अवैध सोन्याच्या आयातीचे प्रमुख केंद्र; एक वर्षात १,३१९ किलो सोने जप्त
नवी दिल्ली - २०२४ मध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचे प्रमाण २०२३ च्या तुलनेत २२ टक्क्यांनी कमी होऊन सुमारे १,०८७ टनांवर आले असल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे.
२०२४ मध्ये देशभरात ७२,४९६ प्रकरणांमध्ये १६,९६६ कोटी रुपयांचे १,०८७ टन अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. भारत हे अवैध सोन्याच्या आयातीचे प्रमुख ठिकाण बनले असल्याचे समोर आले आहे. सीबीआयसीचे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, आम्ही तस्करांना पकडण्यात यशस्वी झालो आहोत; परंतु अद्याप बरेच काही बाहेर येत आहे, जे कोणालाही दिसत नाही.
यूएई, सौदी अरेबियातून येतेय अवैध सोने
डीआरआय अहवालानुसार, भारत हे अवैध सोन्याच्या आयातीचे प्रमुख ठिकाण बनले आहे. यामध्ये सोने आणि चांदी प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि सौदी अरेबियासारख्या आखाती देशांतून येते. येथे सोने कमी किमतीत उपलब्ध आहे. हवाई मार्गाने सोन्याची तस्करी हे भारतातील प्रमुख माध्यम आहे. अलीकडे, नैरोबी आणि अदिस अबाबासारखी आफ्रिकन विमानतळे, तसेच ताश्कंदसारखी विमानतळे ही तस्करीची प्रमुख ठिकाणे म्हणून समोर आली आहेत. २०२३-२४ मध्ये एकट्या डीआरआय अधिकाऱ्यांनी १,३१९ किलो सोने जप्त केले होते.
सोन्याच्या तस्करीत घट
जुलै २०२४ मध्ये सरकारने मौल्यवान धातूवरील आयात शुल्कात कपात केल्यानंतर सोन्याच्या तस्करीत लक्षणीय घट झाली आहे. अधिकाऱ्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या कालावधीत देशातील विविध विमानतळांवर ५४४ कोटी रुपयांचे ८४७ किलो सोने जप्त केले आहे.