पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 05:26 IST2025-05-04T05:25:56+5:302025-05-04T05:26:08+5:30

पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरात येण्यास मनाई, पाकिस्तानातून केली जाणारी आयात येणार शून्यावर

India imposes complete ban on imports from Pakistan; Postal, parcel services suspended | पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 

पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने दहशतवाद्यांना पोसणाऱ्या व आपल्या भूमीतून घातपाती कारवाया करणाऱ्या पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. पाकिस्तानातून कोणत्याही प्रकारच्या वस्तू आयात करण्यावर भारताने शनिवारी तत्काळ संपूर्ण बंदी लागू केली. पाकिस्तानबरोबर हवाई व जमीन मार्गाने सर्व प्रकारच्या टपाल व पार्सल देवाणघेवाण सेवा स्थगित केल्या. पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

नव्या आदेशानुसार इतर देशांतून वळवून भारतात येणाऱ्या पाकिस्तानी वस्तूंच्या आयातीवरही पूर्णपणे बंदी घातली आहे. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान भारताने पाकिस्तानला २७८६ कोटींचा  माल निर्यात केला, तर पाकिस्तानकडून  ३ कोटी ५५ लाख रुपये इतकी आयात झाली. विदेश व्यापार महासंचालनालयाने २ मे ला अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यात स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानमधून कोणत्याही वस्तूंची आयात करण्यावर बंदी असेल.

पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील व्यापारात मोठी घट
पुलवामा हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमधील व्यापारात मोठी घट झाली. भारताने पाकिस्तानचा ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ (एमएफएन) हा दर्जाही रद्द केला. २०११७-१८ मध्ये या दोन देशांत २० हजार कोटी रुपयांची व्यापारी उलाढाल होती.
तर २०२३-२४ मध्ये ती ५४७३ कोटी रुपयांपर्यंत खाली घसरली. काश्मीरचा प्रश्न व सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया या मुद्द्यांमुळे भारत व पाकिस्तानमधील संबंध दीर्घकाळ तणावपूर्ण राहिले आहेत.

भारतीय सागरी हद्दीत पाकिस्तानी जहाजांना बंदी
भारताच्या बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालयाने पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
भारतीय मालमत्ता, मालवाहतूक आणि बंदर पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यासाठी व्यापारी शिपिंग कायदा, १९५८ च्या कलम ४११ अंतर्गत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
सुरक्षा मजबूत करण्याच्या, भारताच्या सागरी हितसंबंधांचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा आदेश पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहील. 

टपाल, पार्सल सेवा बंद
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शनिवारी पाकिस्तानबरोबर हवाई आणि जमीन मार्गाने सर्व प्रकारच्या टपाल आणि पार्सल देवाणघेवाण सेवा स्थगित केल्या. सेवा स्थगित करण्याचा आदेश दळणवळण मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या टपाल विभागाने जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्च संरक्षण अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत सांगितले की, दहशतवादी हल्ल्याला भारताच्या प्रत्युत्तराची पद्धत, लक्ष्य व वेळ ठरवण्याचे ‘पूर्ण अंमलबजावणी स्वातंत्र्य’ सशस्त्र दलांना आहे. 

पाकिस्तानला बसणार फटका : जीटीआरआय
पाकिस्तानमधून होणारी आधीच खूपच कमी असलेली भारताची आयात म्हणजेच दरवर्षी फक्त ५ लाख अमेरिकन डॉलर्स आता शून्यावर येईल.
पाकिस्तानच्या मीठ साठ्यातून काढले जाणारे हिमालयीन गुलाबी मीठ (सैंधव नमक) वगळता इतर कोणत्याही गोष्टीची भारतातील कोणालाही कमतरता जाणवणार नाही, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह- ‘जीटीआरआय’चे संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी सांगितले.
श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, भारत पाकिस्तानी वस्तूंवर अवलंबून नाही, त्यामुळे आर्थिक परिणाम कमी आहे. 
 

Web Title: India imposes complete ban on imports from Pakistan; Postal, parcel services suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.