भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 17:35 IST2025-12-18T17:34:21+5:302025-12-18T17:35:06+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमक्यांदरम्यान भारताकडे BRICS चे अध्यक्षपद आले आहे.

भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
जागतिक व्यापारातील अस्थिरता आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर 'टॅरिफ' धोरणांच्या पार्श्वभूमीवर भारताकडे BRICS चे अध्यक्षपद आले आहे. यंदा ब्राझीलकडूनभारताला मिळालेले अध्यक्षपद केवळ औपचारिकता नाही, तर या माध्यमातून एक खोल राजकीय आणि रणनीतिक संदेश देण्यात आला आहे. भारत 1 जानेवारीपासून अधिकृतपणे BRICS अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहे.
हातोड्यात दडलेला अर्थ
ब्रिक्स अध्यक्षपदाच्या हस्तांतरणावेळी पुढील देशाला प्रतीक स्वरुपात हातोडा दिला जातो. 2024 मध्ये रशियाकडून मिळालेल्या स्टील हातोड्यानंतर, आता ब्राझीलने अमेझॉन रेनफॉरेस्टमधील झाडांपासून बनवलेला लाकडी हातोडा भारताला दिला आहे. या हातोड्याला विशेष महत्त्व आहे. ब्राझीलचे BRICS शेरपा मॉरिसियो लिरियो यांनी सांगितले की, हा हातोडा शाश्वत विकास, मजबूत भागीदारी आणि भारताच्या नेतृत्वक्षमतेवरील विश्वासाचे प्रतीक आहे.
ब्रासिलिया बैठकीत प्रगतीचा आढावा
11 आणि 12 डिसेंबर रोजी ब्रासिलियामध्ये झालेल्या BRICS शेरपांची बैठक केवळ प्रतीकात्मक बाबींवर मर्यादित नव्हती. या बैठकीत 11 सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली 2025 पर्यंत झालेल्या ठोस प्रगतीचा आढावा घेतला.
लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम महत्त्वाचा
ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री मौरो व्हिएरा यांनी स्पष्ट केले की, BRICS ची उपयुक्तता आता केवळ राजनैतिक घोषणांवर नाही, तर सामान्य नागरिकांच्या जीवनावर होणाऱ्या प्रत्यक्ष परिणामांवर मोजली जाईल. त्यांच्या मते, समूहाने ठोस आणि परिणामकारक उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
शाश्वतता आणि समावेशनावर भर
ब्राझीलने आपल्या कार्यकाळात BRICS ला शाश्वत विकास आणि समावेशक वाढ याभोवती केंद्रित ठेवले. जुलैमध्ये रिओ डी जानेरो येथे झालेल्या शिखर परिषदेत तीन महत्त्वाच्या पुढाकारांवर सहमती झाली:-
आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी प्रशासन चौकट
हवामान वित्त व्यवस्थेवर काम
सामाजिक कारणांमुळे पसरणाऱ्या आजारांच्या निर्मूलनासाठी सहकार्य
ट्रम्प प्रशासनाचे आरोप आणि टॅरिफची धमकी
ब्राझीलची अध्यक्षता अशा काळात झाली, जेव्हा ट्रम्प प्रशासनाने BRICS वर अमेरिकन डॉलर कमजोर करण्याचे आरोप केले आणि सदस्य देशांवर 100 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याची धमकी दिली. भारत आणि ब्राझील दोन्ही देश ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापार धोरणांच्या थेट प्रभावाखाली होते.
2026 मध्ये भारताकडे नेतृत्व
आता 2026 साठी भारताची BRICS अध्यक्षता सुरू होत असताना, जागतिक व्यापार आणि कूटनीतीत अनिश्चितता वाढलेली आहे. भारताने संकेत दिले आहेत की, त्याचे नेतृत्व लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या मूलभूत तत्त्वांवर आधारित असेल. भारताच्या प्राधान्यक्रमात भारत हवामान बदल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वैज्ञानिक सहकार्य आणि विकास वित्त या क्षेत्रांतील सुरू असलेल्या उपक्रमांना पुढे नेण्याच्या तयारीत आहे. या बाबतीत भारताची भूमिका केवळ BRICS साठीच नव्हे, तर बदलत्या अमेरिकन धोरणांच्या पार्श्वभूमीवर जागतिक संतुलनासाठीही महत्त्वाची मानली जात आहे.
अमेरिका-विरोधी व्यासपीठ होऊ नये
ट्रम्प यांच्या दबावाच्या राजकारणात भारतासमोर सर्वात मोठे आव्हान असेल की, BRICS ला अमेरिका-विरोधी गट म्हणून उदयास येऊ देऊ नये. भारताची भूमिका BRICS ला बहुपक्षीय सहकार्य, विकास आणि संवादाचा सकारात्मक पर्याय म्हणून बळकट करण्याची असेल. आगामी कार्यकाळ भारतासाठी कूटनीतिक कसोटीचा काळ ठरणार, हे निश्चित मानले जात आहे.