भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उडवले. सिंधूचे जल कराराला स्थगित देत पाकिस्तानची कोंडी केली. अशाच काळात तुर्कीने पाकिस्तानला मदत केली. पाकिस्तानी लष्कराने तुर्कीच्या ड्रोन्सचा वापर करून भारतात हवाई हल्ले करण्याचे प्रयत्न केले. पण, भारतीय लष्कराने तुर्कीचे ड्रोन्स हवेतच टिपले. हवाई हल्ल्यासाठी वापरलेले तुर्कीचे एक ड्रोन आता भारताच्या हाती लागले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तुर्कीने पाकिस्तानला मदत करण्याची भूमिका घेतल्यानंतर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. तुर्कीसोबत असहकार्याचे धोरण स्वीकारण्यात आले असून, तुर्की स्थित अनेक कंपन्यांचे कंत्राट, करार रद्द करण्यात आले आहेत.
कुठे सापडले तुर्कीचे ड्रोन?
भारतातील हवाई दलाच्या तळांवर आणि नागरी वस्त्यांवर हल्ले करण्यासाठी पाकिस्तानने जी ड्रोन्स वापरली ती तुर्कीची आहे. ही ड्रोन्स भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमसमोर फुस्स झाली. पण यातील एक जिवंत ड्रोन्स भारतीय लष्कराच्या हाती लागला आहे.
भारत आणि पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय सीमेपासून १२ किमी आत हा ड्रोन पडलेला होता. राजस्थानातील अनुपगढमध्ये हा ड्रोन मिळाला आहे. येथील एका नर्सरीमध्ये हा ड्रोन पडला होता आणि तो जिवंतही आहे.
ड्रोनमध्ये होती स्फोटकं
मिळालेल्या माहितीनुसार, या ड्रोनमध्ये स्फोटकही होती. याची माहिती मिळाल्यानंतर आधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लष्कराच्या अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक त्या ड्रोनमधील स्फोटक काढली आणि ड्रोनही ताब्यात घेतला.
हा ड्रोन ५ ते ७ फूट लांब आहे. त्याच्या कॅमेरा मोडला आहे. स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ड्रोन जप्त करण्यात आला असून, फॉरेन्सिक तपासणी आणि तंत्रज्ञानाशी संबंधित विश्लेषण केले जाणार आहे. यातून या ड्रोनबद्दल आणखी माहिती मिळू शकेल.