POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 17:26 IST2025-10-03T17:23:55+5:302025-10-03T17:26:10+5:30
India Reaction On POK: गेल्या अनेक दिवसांपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शने सुरू आहेत.

POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
India Reaction On POK: मागील काही दिवसांपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शने सुरू आहेत. शेकडो लोक रस्त्यावर उतरून गोंधळ करत आहेत. पाकिस्तान सरकारने लष्कराला पाचारण केले आहे. पाकव्याप्त काश्मीर मधील परिस्थिती सध्या भयानक आहे. शुक्रवारी नागरिकांच्या निदर्शनांचा चौथा दिवस होता. पाकव्याप्त काश्मीरमधील घटनेवर भारताकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्यावर गोळीबार केला आहे, पण तरीही निदर्शने सुरूच आहेत. पाकिस्तानच्या पीओकेमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांनी पाकिस्तानातील शाहबाज सरकारला हादरवून सोडले आहे. निदर्शक ३८ मागण्यांवर ठाम आहेत. गुरुवारी पीओकेमध्ये झालेल्या निदेर्शनामुळे व्यापार आणि जनजीवन विस्कळीत झाले. धीर कोट आणि पीओकेच्या इतर भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या.
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया
भारताने म्हटले आहे की, पीओकेमधील परिस्थितीची जाणीव आहे. पाकिस्तानच्या दडपशाही धोरणांमुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. असीम मुनीरच्या सैन्याने निदर्शकांवर केलेल्या अत्याचारांवरही भारताने भाष्य केले आहे. पत्रकारांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक भागात निदर्शने आणि पाकिस्तानी सैन्याने निष्पाप नागरिकांवर केलेल्या क्रूरतेचे वृत्त आम्ही पाहिले आहे. आम्हाला वाटते की, हे पाकिस्तानच्या दडपशाहीच्या दृष्टिकोनाचे तसेच जबरदस्तीने आणि बेकायदेशीरपणे व्यापलेल्या प्रदेशातील संसाधनांच्या पद्धतशीर लूटमारीचे परिणाम आहे. पाकिस्तानला त्याच्या भयानक मानवी हक्क उल्लंघनांसाठी जबाबदार धरले पाहिजे, असे जयस्वाल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमधील लोक गेल्या काही दिवसांपासून शाहबाज सरकार आणि असीम मुनीरच्या सैन्याविरुद्ध निदर्शने करत आहेत. अवामी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. मुझफ्फराबाद, मीरपूर, कोटली, रावळकोट आणि नीलम व्हॅलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. पीओकेमधील निदर्शने पाकिस्तानच्या इतर भागात पसरली आहेत. ती बळजबरीने दडपली जात आहेत. निदर्शनांदरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.