भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 19:32 IST2025-12-12T19:30:54+5:302025-12-12T19:32:26+5:30
India vs Pakistan, LoC Border Terrorism: अटकेनंतर प्रागवाल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिमेला सुरुवात

भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
India vs Pakistan LoC Border Terrorism: भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा एक मोठा कट उधळून लावण्यात आला. बीएसएफने एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. दोन दिवसांच्या कारवाईत बीएसएफला मोठे यश मिळाले. अटक करण्यात आलेला संशयित जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या मोठ्या गटाला भारतात घुसवण्याची योजना आखत होता. मिळालेल्या वृत्तानुसार, जम्मू जिल्ह्यातील प्रागवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर ही अटक करण्यात आली. संशयित दहशतवाद्याकडे चिनी बनावटीचे शस्त्र असल्याचा संशय आहे. संशयित दहशतवाद्याच्या अटकेनंतर बीएसएफने प्रागवाल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे.
दहशतवाद्याची कसून चौकशी
प्रागवालमधील संशयिताला अटक केल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सूत्रांनी पुढे सांगितले की, त्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आणि संवेदनशील परिसरात त्याच्या उपस्थितीमागील हेतू निश्चित करण्यासाठी प्राथमिक चौकशी सुरू आहे.
दहशतवादी कमांडरला परत पाठवण्याचे प्रयत्न
सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की जम्मू-काश्मीरमधून अनेक वर्षांपूर्वी पाकिस्तानात पळून गेलेल्या दहशतवादी कमांडरना परत भारतात पाठवण्याचा प्रयत्न ISI कडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच बीएसएफच्या महानिरीक्षकांनी सांगितले की पाकिस्तानी हद्दीतील दहशतवादी लाँच पॅड पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे बीएसएफ अधिक सतर्क झाले आहे. अलिकडेच पाकिस्तानने दहशतवादी लाँच पॅड सीमेपासून दूर हलवल्याची बातमी समोर आली होती. भारताविरुद्ध नवीन कट रचण्याचे मनसुबे रोखण्यात आले आहेत असे पाकिस्तानला दाखवायचे होते. त्यामुळे हे पाऊल उचलले होते. भारतीय लष्कर सीमेवरील सर्व पाकिस्तानी हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
लष्कर आणि जैश यांच्यात पाकिस्तानमध्ये बैठक
६ नोव्हेंबरला पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांच्यात एक मोठी बैठक झाल्याची बातमी समोर आली आहे. जिहादींच्या या बैठकीचे विशेष फोटोदेखील प्रसिद्ध करण्यात आले. लष्करचा उपप्रमुख सैफुल्लाह कसुरी याच्यासह अनेक जैश कमांडर या बैठकीत उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूरपूर्वी बहावलपूरमध्येही अशीच एक बैठक झाल्याची माहिती आहे.