Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 20:23 IST2025-05-01T20:22:08+5:302025-05-01T20:23:35+5:30
India Extends Deadline For Pakistani Citizens: पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी ३० एप्रिल अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती, जी आता वाढवण्यात आली.

Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी नागरिकांना मायदेशात परतण्याचा आदेश दिला. यासाठी ३० एप्रिल ही डेडलाइन निश्चित करण्यात आली. परंतु, वाघा-अटारी सीमेवर अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या विनंतीनंतर डेडलाइनमध्ये बदल करण्यात आला. पुढील आदेश येईपर्यंत पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परतू शकतात, असे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
केंद्रीय गृह मंत्रालयाने आपल्या आदेशात असे म्हटले आहे की, 'पाकिस्तानी नागरिक आता पुढील आदेश येईपर्यंत त्यांच्या देशात परतू शकतात. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी ३० एप्रिल अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती, जी आता वाढवण्यात आली. पुढील आदेश येईपर्यंत पाकिस्तानी नागरिक अटारी सीमेवरून त्यांच्या देशात परतू शकतात.'
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर कारवाई करत पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आणि त्यांना भारत सोडण्याचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा दिवसांत एकूण ७८६ नागरिकांनी भारत सोडले, ज्यात ५५ राजदूर आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. पाकिस्तानी व्हिसावर भारतात आलेल्या ८ भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. सार्क व्हिसा धारकांसाठी भारत सोडण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल होती. तर, मेडिकल व्हिसा धारकांसाठी शेवटची तारीख २९ एप्रिल होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून कोणताही पाकिस्तानी नागरिक भारतात राहता कामा नये, याची खात्री करण्याचे आदेश दिले. त्यानंतर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी मुख्य सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ज्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले, त्यांना भारताबाहेर काढण्याचे आदेश दिले.