india clearly said that pakistan never asked for corona vaccine so we did not provide | पाकिस्तानने कधी मागितली नाही, म्हणून कोरोना लस दिली नाही; भारताचे स्पष्टीकरण

पाकिस्तानने कधी मागितली नाही, म्हणून कोरोना लस दिली नाही; भारताचे स्पष्टीकरण

ठळक मुद्देभारताकडून शेजारी देशांना कोरोना लसीचा पुरवठापाकिस्तानाकडून कोरोना लसीची मागणी नाही - परराष्ट्र मंत्रालयप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा निर्देश जारी

नवी दिल्ली :भारताने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन कोरोना लस शेजारी देशांना पाठवण्यात आल्या. भूतान, मालदीव, नेपाळ, म्यानमार आणि बांगलादेश या देशांना कोरोना लसींचे डोस पाठवण्यात आले. मात्र, पाकिस्तानला कोरोना लस न पाठवल्याबाबत विचारणा केली असता, पाकिस्तानने कोरोना लसीची मागणी केली नाही, म्हणून आम्ही पाठवली नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले की, कोरोना लस निर्मितीत भारत जागतिक स्तरावर अग्रेसर आहे. भारताकडून कोरोना लस घेण्यात अन्य देशांचे हित आहे. कोरोना संकटाविरोधात लढण्यासाठी भारतातील कोरोना लस निर्मिती आणि वितरण क्षमता सर्वांसाठी लाभदायक सिद्ध होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच सांगितले होते, याची आठवण श्रीवास्तव यांनी यावेळ करून दिली. 

नेपाळपासून सेशल्सपर्यंत कोरोना लसीचा पुरवठा

२० जानेवारी २०२१ पासून शेजारी देशांना कोरोना लसीचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात दीड लाख कोरोना लसीचे डोस भूतान आणि एक लाख कोरोना लसीचे डोस मालदीव येथे पाठवण्यात आले. यानंतर नेपाळमध्ये दहा लाख, बांगलादेशमध्ये २० लाख, म्यानमारला १५ लाख, मॉरिशियसला एक लाख आणि सेशल्समध्ये ५० हजार कोरोना लसीचे डोस पाठवण्यात आले, अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली. 

पाकिस्तानकडून मागणी नाही

श्रीवास्तव यांनी सांगितले की, माझ्या माहितीप्रमाणे अद्यापपर्यंत तरी पाकिस्तानाकडून कोरोना लसीची मागणी करण्यात आलेली नाही. पाकिस्तानी सरकार किंवा व्यवसायिक स्तरावरूनही कोरोना लसीची मागणी भारताकडे नोंदवली गेली नाही. त्यामुळे भारताकडून पाकिस्तानला कोरोना लसीचे डोस पुरवण्याचा संबंधच येत नाही, असे त्यांनी नमूद केले.

पाकिस्तान पुन्हा चीनपुढे नतमस्तक; मिळाला चिनी कोरोना लसीचा आधार

प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरक्षेचे निर्देश

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने परदेशातील मंडळांना सुरक्षा आणि सावधगिरी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ब्रिटनमधील खलिस्तान समर्थकांनी निदर्शने करण्याची सूचना गंभीरतेने घेण्यात आली असून, त्यानुसार निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती श्रीवास्तव यांनी यावेळी बोलताना दिली. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: india clearly said that pakistan never asked for corona vaccine so we did not provide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.