मोठी बातमी! कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार, चीनसोबतच्या बैठकीत शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 21:11 IST2025-01-27T21:09:48+5:302025-01-27T21:11:44+5:30
India-China Relations: भारत आणि चीनी अधिकाऱ्यांची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार, चीनसोबतच्या बैठकीत शिक्कामोर्तब
India-China Relations : एकीकडे प्रयागराजमध्ये पवित्र महाकुंभ सुरू आहे, तर दुसरीकडे आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (27 जानेवारी) ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी 26-27 जानेवारीला चीनच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी चीनी अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली, ज्यात दोन्ही देशांनी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
2020 पासून हा कैलास मानसरोवर यात्रा बंद होती. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात झालेल्या बैठकीत ही यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशांनी 2025 च्या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, संबंधित यंत्रणा विद्यमान करारांनुसार यावर चर्चा करतील, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
Kailash Mansarovar Yatra to resume this summer as India-China mark 75 years of diplomatic ties
— ANI Digital (@ani_digital) January 27, 2025
Read @ANI Story | https://t.co/xaSrz49hHa#India#China#KailashMansarovarYatrapic.twitter.com/KNJqkl0pk0
या बैठकीत दोन्ही देशांनी 2025 च्या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, दोन्ही देशांनी जलवैज्ञानिक डेटाची तरतूद पुन्हा सुरू करण्यावर आणि सीमापार नद्यांशी संबंधित इतर सहकार्यावर चर्चा करण्यासाठी भारत-चीन तज्ञ स्तरावरील बैठक घेण्याचेही मान्य केले आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर चीनने बांधलेल्या धरणाबाबत भारताच्या चिंता या बैठकीत मांडण्यात आल्या. या वर्षी भारत-चीन राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने संबंध वेगाने दृढ करण्यावर सहमती झाली आहे.
भारत-चीन थेट हवाई सेवा पुन्हा सुरू होणार
दोन्ही देशांमधील या महत्त्वपूर्ण बैठकीत संवाद आणि देवाणघेवाणीला अधिक चालना देण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यावर सहमती झाली. याशिवाय दोन्ही देशांमधील थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्यावर तत्त्वत: सहमती झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, भारत आणि चीन संबंध स्थिर करण्यासाठी आणि पुनरुज्जीवित करण्यासाठी काही लोककेंद्रित पावले उचलण्यास सहमत आहेत.