India China FaceOff: हिंदी महासागरात भारताचा चीनला शह; 'या' देशांच्या सागरी संरक्षण दलांचेही सहकार्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 07:14 IST2020-06-30T02:18:19+5:302020-06-30T07:14:10+5:30
चीनच्या कुरापती रोखण्यासाठी भारताची हिंदी महासागरात गस्त, चीनचे नौदल हिंदी तसेच प्रशांत महासागरात व दक्षिण चीनमधील समुद्रात कायम आक्रमक पवित्र्यात उभे असते.

India China FaceOff: हिंदी महासागरात भारताचा चीनला शह; 'या' देशांच्या सागरी संरक्षण दलांचेही सहकार्य
नवी दिल्ली : चिनी सैनिकांबरोबर भारतीय जवानांच्या झालेल्या संघर्षानंतर नौदलाने चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हिंदी महासागरात गस्त वाढविली आहे. चीन केवळ सीमेवरच नव्हे, तर समुद्री मार्गांवरही काही कुरापती करू शकेल, हे लक्षात घेऊ न ही गस्त वाढविली आहे.
नौदलाने चीनच्या हालचालींची माहिती मिळविण्यासाठी अमेरिकी नौदल तसेच जपानच्या सागरी संरक्षण दलाचीही मदत घेतली. या पट्ट्यात चिनी नौदलाकडून नेहमी आगळीक होते. भारताच्या आयएनएस राणा, आयएनएस कुलीश तर जपानच्या जेएस कशिमा, जेएस शिमायुकी युद्धनौका सरावात सहभागी झाल्या.
चीनचे नौदल हिंदी तसेच प्रशांत महासागरात व दक्षिण चीनमधील समुद्रात कायम आक्रमक पवित्र्यात उभे असते. त्यामुळे या परिसरात भारत व जपानी नौदलाने केलेल्या एकत्रित युद्धसरावाला विशेष महत्त्व आहे. हिंदी तसेच प्रशांत महासागर क्षेत्रात अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, फ्रान्स या देशांच्या नौदलांनी परस्पर सहकार्य वाढविण्यावर भर दिला आहे. या प्रदेशात चीनने आपला लष्करी प्रभाव वाढविण्यास सुरूवात केली होती. हे इतर देशांना मान्य नाही.
सीमावादावर आज बैठक
सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीन यांच्या वरिष्ठ लष्करी कमांडरांची तिसरी बैठक मंगळवारी होणार आहे. गेल्या बैठकीत दोन्ही देशांमध्ये सीमेवरील वादग्रस्त ठिकाणी सैन्य मागे घेण्यावर सहमती झाली होती. परंतु सैन्य मागे घेणे तर सोडाच, उलट चीनने या बैठकांनंतर सीमेवर अधिक सैन्याची व युद्धसाहित्याची जमवाजमव केली.