आधी भारतविरोधी घोषणाबाजी, आता चीन-पाकविरोधात रॅली; 'त्या' घटनेनं पालटली काश्मीरमधील परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 14:48 IST2020-06-23T14:35:17+5:302020-06-23T14:48:22+5:30
काश्मीरमधील परिस्थिती बदलली; स्थानिकांनी काढली तिरंगा रॅली

आधी भारतविरोधी घोषणाबाजी, आता चीन-पाकविरोधात रॅली; 'त्या' घटनेनं पालटली काश्मीरमधील परिस्थिती
श्रीनगर: चीनसोबतचे आधीच ताणले गेलेले संबंध विकोपाला गेल्यानं देशातील परिस्थिती बदलताना पाहायला मिळते आहे. याचं प्रतिबिंब काश्मीरमध्येही दिसू लागलं आहे. काश्मीरमध्ये बऱ्याचदा भारताविरोधात घोषणाबाजी व्हायची. मात्र आता परिस्थिती बदलू लागली आहे. उत्तर काश्मीरमध्ये असलेल्या कुपवाडामध्ये आता पाकिस्तान आणि चीनविरोधात घोषणाबाजी सुरू झाली आहे. कुपवाडा नियंत्रण रेषेजवळ येत असल्यानं ही घटना महत्त्वाची आहे.
काश्मीरच्या कुपवाड्यातील नागरिकांनी हाती तिरंगा घेऊन चीनविरोधात रॅली काढली. यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण सहभागी झाले होते. लष्कराचं मनोबल वाढवणारी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं. त्यांनी चीनमध्ये तयार करण्यात आलेला एलईडी टीव्ही आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा पुतळा जाळून आपला संताप व्यक्त केला.
स्थानिकांनी काढलेल्या तिरंगा रॅलीमध्ये भाजपाचे नेते आणि कार्यकर्तेदेखील सहभागी झाले होते. जिल्हा मुख्यालयातल्या बाजारांमधून तिरंगा रॅली पुढे गेली. यावेळी हिंदुस्तान झिंदाबादसोबतच चीन-पाकिस्तानविरोधी घोषणाही देण्यात आल्या. पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्यानं भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्याविरोधात या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. काश्मीरमधील परिस्थिती बदलली असल्याचं चीननं लक्षात ठेवावं. या ठिकाणी दहशतवादाला खतपाणी घालणं पाकिस्ताननं बंद करावं, अशा भावना रॅलीत सहभागी झालेल्यांनी व्यक्त केल्या.
मोठी बातमी! चीन पूर्व लडाखमधून माघार घेण्यास तयार; भारताला यश
भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये १२ तास बैठक; भारतानं स्पष्ट शब्दांत सुनावलं
नाद करा, पण आमचा कुठं! भारतीय जवानांनी थेट चिनी अधिकाऱ्याला उचललं
चीन युद्धाच्या तयारीत?; लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत हवाई दलाच्या हालचाली
जुना मित्र कामी येणार; चीनला भिडणाऱ्या भारताला 'ब्रह्मास्त्र' देणार