India-Afganistan Relationship: तालिबानशासित अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आठवडाभराच्या भारत दौऱ्यावर आहेत. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी शुक्रवारी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. या द्विपक्षीय बैठकीत भारताने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दूतावास उघडण्याची अधिकृत घोषणा केली. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी काबुल येथील सध्याच्या 'टेक्निकल मिशन'ला भारतीय दूतावासाचा दर्जा देणार असल्याचे सांगितले. एस. जयशंकर यांनी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुताकी यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान ही घोषणा केली. जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाला पाठिंबाही व्यक्त केला. २०२१ नंतर पहिल्यांदाच भारताने अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे.
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी हे भारत दौऱ्यावर आहेत. २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यानंतर तालिबानचे वरिष्ठ नेते पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले आहेत. या भेटीदरम्यान, द्विपक्षीय, राजकीय आणि आर्थिक अशा विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. २०२१ मध्ये तालिबानने अफगानिस्तानमध्ये सत्ता ताब्यात घेतल्यावर भारताने काबुलमधील आपला दूतावास बंद केला होता. मात्र, व्यापार, वैद्यकीय मदत आणि सुविधा पुरवण्यासाठी भारताने वर्षभराने एक लहान 'टेक्निकल मिशन' पुन्हा सुरू केले होते. आता या मिशनला पुन्हा पूर्ण दूतावासाचा दर्जा देण्यात आला आहे, जो दोन्ही देशांमधील संबंध सामान्य करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
अफगानिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत करताना परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, हा दौरा दोन्ही देशांमधील संबंध पुढे नेण्यासाठी आणि मैत्री निश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. एक शेजारी आणि अफगान लोकांचा हितचिंतक म्हणून, भारताला अफगानिस्तानच्या विकास आणि प्रगतीमध्ये रस आहे." जयशंकर यांनी भारताने अफगानिस्तानला आरोग्य, नैसर्गिक आपत्ती आणि अन्न सहाय्यता यांसारख्या विविध क्षेत्रांत केलेल्या मदतीचा उल्लेख केला.
यावेळी, त्यांनी सीमापार दहशतवादाच्या धोक्यावरही चिंता व्यक्त केली. "विकास आणि समृद्धीसाठी असलेली आपली सामायिक वचनबद्धता, आपल्याला भेडसावणाऱ्या सीमापार दहशतवादाच्या धोक्यामुळे धोक्यात आली आहे. दहशतवादाच्या सर्व प्रकारांशी मुकाबला करण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे," असं एस जयशंकर म्हणाले. जयशंकर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अफगानिस्तानने भारतासोबत दर्शवलेल्या एकजुटीबद्दल कौतुक व्यक्त केले, तसेच भारताच्या सुरक्षा चिंतांबद्दल त्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेची प्रशंसा केली. 'खेळ हे आणखी एक क्षेत्र आहे जिथे दोन्ही देशांचे दीर्घकालीन संबंध आहेत. अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटचा उदय खरोखरच प्रभावी आहे. भारताला अफगाण क्रिकेटला पाठिंबा दिल्याबद्दल आनंद आहे,' असेही परराष्ट्र मंत्री म्हणाले.
कोणालाही आमच्या भूमीचा चुकीचा वापर करु देणार नाही
"दिल्लीत येऊन मला आनंद होत आहे आणि या भेटीमुळे दोन्ही देशांमधील समज वाढेल. भारत आणि अफगाणिस्तानने त्यांचे संबंध आणि देवाणघेवाण वाढवावी. आम्ही कोणत्याही गटाला आमच्या भूमीचा वापर इतरांविरुद्ध करू देणार नाही. अफगाणिस्तानात अलिकडेच झालेल्या भूकंपात, भारताने पहिली मदत दिली. अफगाणिस्तान भारताकडे जवळचा मित्र म्हणून पाहतो. अफगाणिस्तान परस्पर आदर, व्यापार आणि लोकांमधील संबंधांवर आधारित संबंध इच्छितो. आम्ही एक समंजस सल्लागार यंत्रणा तयार करण्यास तयार आहोत, जी आपले संबंध मजबूत करण्यास मदत करेल," असं अफगाणिस्तानचे मंत्री मुत्ताकी म्हणाले.
Web Summary : India will reopen its embassy in Kabul, upgrading its 'Technical Mission'. Discussions with Afghanistan covered bilateral ties, economic issues, and concerns about cross-border terrorism, emphasizing the need for cooperation.
Web Summary : भारत काबुल में अपना दूतावास फिर से खोलेगा, 'टेक्निकल मिशन' को उन्नत करेगा। अफगानिस्तान के साथ द्विपक्षीय संबंधों, आर्थिक मुद्दों और सीमा पार आतंकवाद पर चर्चा हुई, जिसमें सहयोग की आवश्यकता पर जोर दिया गया।