अपूर्ण कुंपण, घुसखोरीचा धोका; भारत-बांग्लादेश सीमेवर मोदी सरकारसमोर कोणती आव्हाने..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 17:10 IST2025-02-12T17:09:25+5:302025-02-12T17:10:10+5:30
बांग्लादेशात सत्तांतर झाल्यापासून सीमा भागात तणावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे.

अपूर्ण कुंपण, घुसखोरीचा धोका; भारत-बांग्लादेश सीमेवर मोदी सरकारसमोर कोणती आव्हाने..?
India Bangladesh Border Safety: बांग्लादेशात सत्तांतर झाल्यापासून भारत आणि बांग्लादेशातील संबंध बिघडले आहेत. सीमा भागातही तणावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने मंगळवारी (11 फेब्रुवारी 2025) लोकसभेत सीमेवरील परिस्थितीबाबत महत्वाची माहिती दिली. केंद्राने सांगितले की, भारत आणि बांग्लादेशमधील एकूण 4096 किमी सीमेपैकी 864.5 किमी सीमेवर अद्याप कुंपण बसवण्यात आले नाही. तृणमूल काँग्रेसचे खासदार दीपक अधिकारी यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली.
पश्चिम बंगालमधील तृणमूलच्या खासदाराने गृह मंत्रालयाला बांग्लादेशच्या सीमेला लागून असलेल्या एकूण जमिनीचा तपशील, बांग्लादेशशी सीमा असलेल्या राज्यांचा तपशील, बांग्लादेशच्या सीमेच्या एकूण लांबीचा तपशील आणि सीमेवर कुंपण न लावण्याची कारणे विचारली होती.
या प्रश्नांच्या उत्तरात केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी सभागृहात सांगितले की, भारत-बांग्लादेश सीमेची एकूण लांबी 4,096.7 किलोमीटर आहे. बांग्लादेशशी सीमा सामायिक केलेली राज्ये पश्चिम बंगाल (2,216.7 किमी), आसाम (263 किमी), मेघालय (443 किमी), त्रिपुरा (856 किमी) आणि मिझोराम (318 किमी) आहेत.
कुंपणाचे काम का होऊ शकले नाही?
864.5 किमी भारत-बांग्लादेश सीमेवर कुंपण घालणे बाकी आहे, ज्यामध्ये 174.5 किमी दरीचा भाग आहे. याशिवाय, इतर भागात दलदलीची जमीन आणि भूस्खलनाची प्रवण क्षेत्रे यांसारख्या कठीण आव्हानांमुळे कुंपण पूर्ण होऊ शकले नाही. तसेच, बॉर्डर गार्ड बांग्लादेश (बीजीबी) चा आक्षेप आणि भूसंपादनास होणारा विलंब, यामुळेही कुंपणाचे काम पूर्ण होऊ शकले नाही, अशी माहिती त्यांनी दिली.