नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधात एकजूट झालेल्या इंडिया आघाडीची शनिवारी (13 जानेवारी) सकाळी 11.30 वाजता बैठक होणार आहे. सूत्रांनी सांगितले की, इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या या ऑनलाइन बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांना संयोजक बनवले जाऊ शकते. तसेच काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांना इंडिया आघाडीचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते.
सूत्रांनी सांगितले की, इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या बहुतांश पक्षांनी नितीश कुमार यांना संयोजक बनविण्यावर एकमत केले आहे, परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी याबाबत काहीही सांगितलेले नाही. इंडिया आघाडीची शनिवारी होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण इंडिया आघाडीला जागावाटप अंतिम करायचे आहे. तर काँग्रेसची राष्ट्रीय आघाडी समिती दररोज राज्यनिहाय जागावाटपावर चर्चा करत आहे.
आत्तापर्यंत काँग्रेस आघाडी समितीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP), दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी, यासह आरजेडी आणि समाजवादी पक्ष यांच्यासोबत जागावाटपाबाबत बैठका घेतल्या आहेत. मात्र, अद्याप टीएमसीसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही.
सूत्रांनी काल ( दि.11) सांगितले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीने काँग्रेसला लोकसभेच्या 42 जागांपैकी 2 जागांची ऑफर दिली आहे. फक्त दोन जागा असल्यामुळे टीएमसीची या ऑफरसाठी तयार नसल्याचे काँग्रेसने म्हटले होते. दरम्यान, टीएमसीशी संबंधित सूत्रांनी शुक्रवारी सांगितले की, टीएमसी बंगालमध्ये काँग्रेसला 3 जागा देण्यास तयार आहे, परंतु त्यासाठी टीएमसीला आसाममध्ये दोन आणि मेघालयमध्ये एक जागा द्यावी लागेल.