"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 23:17 IST2025-07-26T23:16:46+5:302025-07-26T23:17:36+5:30
Priyanka Chaturvedi on IND vs PAK Asia Cup 2025 Schedule : आशिया कपमध्ये १४ सप्टेंबरला भारत विरूद्ध पाकिस्तान सामना होणार असल्याची पाक क्रिकेट बोर्डाची घोषणा

"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
Priyanka Chaturvedi on IND vs PAK Asia Cup 2025 Schedule : आशिया कप २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही स्पर्धा ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये खेळवली जाईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नक्वी यांनी आज हे वेळापत्रक जाहीर केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कुठल्याही प्रकारचा संबंध नसेल, असे भारत सरकारने ठणकावून सांगितले होते. तरीही आज क्रिकेट सामन्याचे वेळापत्रक घोषित झाल्याने, शिवसेना उबाठा गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वैदी यांनी संताप व्यक्त केला.
प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना झाला तर हे भारत सरकारचे आणि बीसीसीआयचे अपयश आहे. आज कारगिल दिवस आहे. आपण आपल्या जवानांची शौर्यगाथा स्मरणात कायम ठेवतो. जे जवान देशासाठी शहीद झाले, त्यांना आपण नमन करतो. त्याच दिवशी पाकिस्तानचे मंत्री आणि क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आशिया चषकाची घोषणा करतात आणि भारत-पाकिस्तान दुबईमध्ये होणार असल्याचे सांगतात. क्रिकेट लिजंडस लीग सुरू झाले, तेव्हाही मी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत आक्षेप नोंदवला होता."
"भारत सरकारने मिशन सिंदूरअंतर्गत आमचे शिष्टमंडळ जगभरात पाठवले होते. त्यात मी स्वतः देखील होते. त्यात हेच ठणकावून सांगण्यात येत होते की दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत. दहशतवादी अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध घेणे ही प्राथमिक जबाबदारी असली पाहिजे. सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला आहे. देशाचे बडे अधिकारी सांगतात की ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. जर आपण पाकिस्तानशी सर्व प्रकारचे संबंध तोडत आहोत, त्यांचे युट्युब चॅनेल ब्लॉक केलेले आहेत, ट्विटर बंद करण्यात आले आहे, मग भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होण्यासाठी बीसीसीआयला का परवानगी दिली जात आहे?" असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला.
"देशाचा प्रत्येक नागरिक याचा विरोध करेल. कारण आग अजूनही ज्वलंत आहे. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद संपवणार नाही, तोपर्यंत त्यांच्याशी भारत कुठल्याही पद्धतीचा संबंध ठेवणार नाही असाच पवित्रा असला पाहिजे. मला अशी आशा आहे की या प्रकरणावर सर्वप्रथम बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट करावी. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने आम्हाला सांगू नये. बीसीसीआयने आम्हाला माहिती द्यावी. आणि अखेर जर तो सामना खेळवला जाणार असेल तर मी सरकारला कायम विचारत राहीन की जर तुम्हाला भारत पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवायचाच होता, तर तुम्ही आम्हाला जगभरात कोणत्या मिशनवर पाठवले होते," अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली.