भीमगोंडा देसाईकोल्हापूर : कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्यापाणी विसर्गासंबंधी बुधवारी शासकीय आणि स्थानिक यंत्रणेने दिलेल्या माहितीत विसंगती असल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाने दुपारी एकपर्यंत २ लाख ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग असल्याचा दावा केला आहे. याउलट स्थानिक यंत्रणेच्या माहितीनुसार प्रत्यक्षात १ लाख ८९ हजार ८८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या आकडेवारीनुसार बुधवारपेक्षा गुरुवारी १० हजार १२० क्युसेक पाण्याचा विसर्ग कमी झाल्याचे समोर आले आहे. परिणामी, धरणातीलपाणी विसर्गासंबंधी संभ्रम निर्माण झाला आहे.अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर तेथील पाण्याच्या फुगवट्यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होत असल्याचे सार्वजनिक आरोप आहे. याउलट कर्नाटक जलसंपदा विभाग अलमट्टी पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण होत नाही, असे वडनेर समितीच्या अहवालातच म्हटले आहे, असा दावा करते. म्हणून अलमट्टी धरणातील पाणी विसर्गाचा मुद्दा नेहमीच कळीचा ठरला आहे.सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. सर्वच नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. परिणामी, पुन्हा एकदा पूरबाधित रहिवाशांच्या नजरा आलमट्टी धरणातील पाणी विसर्गाकडे लागून राहिल्या आहेत. अशातच प्रशासनाकडून आलेल्या विसर्गाची आणि स्थानिक यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीत तफावत असल्याने नेमका पाण्याचा विसर्ग किती, असा प्रश्न निर्माण होत आहे.
पर्यटकांनीही फुल्लअलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण आणि परिसर पाण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्रातील पर्यटकाची वर्दळ सध्या वाढली आहे. पर्यटकांनी अलमट्टी परिसर फुल्ल होत आहे. वर्षा सहल करणाऱ्यांची पावले तिकडे वळत आहेत.