पत्नी करत राहिली विनवणी, शेतकरी जमिनीवर कोसळला; उभ्या पिकावर प्रशासनाने फिरवला ट्रॅक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 09:20 IST2025-02-19T09:19:59+5:302025-02-19T09:20:40+5:30

भाजपा शासन काळात शेतकऱ्यांवर जितके अत्याचार  झाले तितके इंग्रज काळातही झाले नाहीत असं कमलनाथ यांनी म्हटलं.

In Vidisha, Madhya Pradesh, the administration took action against a farmer, a tractor was driven over the crops | पत्नी करत राहिली विनवणी, शेतकरी जमिनीवर कोसळला; उभ्या पिकावर प्रशासनाने फिरवला ट्रॅक्टर

पत्नी करत राहिली विनवणी, शेतकरी जमिनीवर कोसळला; उभ्या पिकावर प्रशासनाने फिरवला ट्रॅक्टर

विदिशा - मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात सिरोंज इथं एका शेतकऱ्याच्या उभ्या पिकावर प्रशासनाने ट्रॅक्टर फिरवला आहे. सरकारच्या या कारवाईने शेतकरी मूलचंद यांना मोठा धक्का बसला आणि ते बेशुद्ध पडले. या कारवाईमुळे शेतकऱ्याच्या १८ एकर जमिनीवरील पिक नष्ट झालं.  ही कारवाई रोखण्यासाठी शेतकऱ्याची पत्नी अधिकाऱ्यांकडे विनवण्या करत राहिली परंतु तिचे काहीही ऐकलं नाही. केतन डॅम परिसरात हा प्रकार घडला आहे.

या कारवाईवर तहसीलदार म्हणाले की, ही जमीन २ वर्षापूर्वी ताब्यात घेण्यात आली होती आणि जमिनीवरील भाडेपट्टा रद्द करण्यात आला होता. ही सरकारी जमीन होती, तिथले अतिक्रमण हटवणे गरजेचे होते. आम्ही नियमानुसार ही कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितले तर ऑक्टोबरमध्येच जमीन वापराचा दंड भरला होता त्याची पावती मला दिली होती. तरीही प्रशासनाने पीक नष्ट केले. माझ्या मेहनतीच्या कमाईवर ट्रॅक्टर चालताना पाहून मला सहन झाले नाही. मला हृदयविकाराचा सौम्य झटका आला आणि मी बेशुद्ध पडलो. जेव्हा शुद्धीत आलो तेव्हा समोर पीक नव्हते असं शेतकरी मूलचंद यांनी सांगितले.

घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये आक्रोश

हा प्रकार समोर आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आक्रोश पसरला असून त्यावर राजकारणही रंगू लागलं आहे. त्रस्त शेतकरी आणि त्याच्या पत्नीचे फोटो पाहून लोक प्रशासनाच्या कारवाईचा निषेध करत आहेत. विरोधी पक्षानेही सरकारकडे या प्रकाराचा जाब विचारला आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी प्रशासनाने केलेल्या कारवाईचा तीव्र शब्दात विरोध केला आहे. इंग्रजांच्या काळातही असाच शेतकऱ्यांवर अन्याय केला जात होता. भाजपा शासन काळात शेतकऱ्यांवर जितके अत्याचार  झाले तितके इंग्रज काळातही झाले नाहीत असं कमलनाथ यांनी म्हटलं.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी मूलचंद यांच्या पिकांवर प्रशासनाने ट्रॅक्टर चालवला. यावेळी शेतकऱ्याची पत्नी अधिकाऱ्यांना वारंवार विनवणी करत राहिली. पीक काढायला फक्त ८-१० दिवस बाकी आहेत, तेवढे द्या परंतु प्रशासनाने पत्नीचं काहीही ऐकलं नाही. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यावर निशाणा साधला. 

Web Title: In Vidisha, Madhya Pradesh, the administration took action against a farmer, a tractor was driven over the crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी