चेन्नई - तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका यावर्षी पार पडणार आहे. त्यातून राज्यात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. भाजपा नेते आणि तामिळनाडूचे प्रभारी म्हणून मंत्री पीयूष गोयल यांनी आज तामिळनाडू दौरा केला. या दौऱ्यात गोयल यांनी मोठी घोषणा केली. आगामी निवडणुका एनडीएचे घटक पक्ष असलेल्या एआयडिएमकेचे नेते के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात लढवल्या जातील. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पलानीस्वामी यांचं नाव समोर आले आहे.
मंत्री पीयूष गोयल यांनी चेन्नई येथे एआयडिएमकेचे नेते पलानीस्वामी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी जागावाटपावर चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पीयूष गोयल म्हणाले की, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूत पलानीस्वामी मिळून एनडीए डिएमके सरकारला बाहेरचा रस्ता दाखवेल. मी आज पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि पक्षाचे अध्यक्ष नितीन नबीन यांच्या शुभेच्छा घेऊन इथं आलोय. केंद्रात पंतप्रधान आणि तामिळनाडूत पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात एनडीए आघाडी भ्रष्ट, अयशस्वी आणि विकासविरोधी डिएमके सरकारला सत्तेतून खाली खेचेल. या निवडणुकीत डिएमकेचा पराभव निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर पीयूष गोयल हे आमच्या घरी आले त्याचा आनंद आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन हेदेखील सोबत होते. आम्ही निवडणुकीबाबतीत चर्चा केली. त्याशिवाय उद्या होणाऱ्या सभेच्या तयारीचाही आढावा घेतला. जवळपास ५ लाख लोक या सभेला येतील. तामिळनाडूत सरकार सर्वच क्षेत्रात अयशस्वी ठरले आहे. भाजपा आणि एआयडिएमके आघाडी मजबूत आहे असं के. पलानीस्वामी यांनी म्हटलं.
नेतृत्वाबाबत स्पष्ट संदेश
पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करून एनडीएने निवडणुकीपूर्वीच नेतृत्वाबाबत होणारा संभ्रम दूर केला आहे. जर एनडीए सत्तेत आली तर राज्याला स्थिर आणि विकासाच्या मार्गावर चालणारे सरकार मिळेल असं पीयूष गोयल यांनी म्हटलं. डिएमके सरकारच्या काळात युवक, शेतकरी आणि महिलांसाठी काही काम झाले नाही. सध्याचे सरकार भ्रष्ट आणि कामचोर झाल्याने त्यांना सत्ता चालवण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही असा घणाघातही गोयल यांनी केला.
दरम्यान, तामिळनाडूत एनडीए त्यांचा विस्तार करत आहे. टीटीवी दिनाकरन यांचा एएमएमके आणि पीएमके हे पक्ष एनडीएत सहभागी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी मदुरै येथे रॅली झाली होती. त्यानंतर ही घडामोड घडली. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी चेन्नईत एनडीएच्या नेत्यांची बैठक झाली. ही बैठक पलानीस्वामी यांच्या घरी होती. त्यात भाजपा आमदार वनथी श्रीनिवासनही सहभागी होती. तामिळनाडूत नेतृत्व निश्चित केल्याने आणि नवीन पक्ष एनडीएत सहभागी झाल्याने डिएमकेविरोधात भाजपा तगडी फौज मैदानात उतरवत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.