कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 10:50 IST2025-09-18T10:49:58+5:302025-09-18T10:50:26+5:30
Karnataka Asembly Election News: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मतचोरीच्या मुद्द्यावरून भाजपाची कोंडी करण्यात येत आहे. त्यात आज राहुल गांधी पत्रकार परिषदेमधून मतचोरीबाबत मोठा दावा करण्याची शक्यता आहे. मात्र कर्नाटकमध्ये मतचोरीचा आरोप काँग्रेसवरच उलटण्याची शक्यता दिसत आहे.

कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मतचोरीच्या मुद्द्यावरून भाजपाची कोंडी करण्यात येत आहे. त्यात आज राहुल गांधी पत्रकार परिषदेमधून मतचोरीबाबत मोठा दावा करण्याची शक्यता आहे. मात्र कर्नाटकमध्ये मतचोरीचा आरोप काँग्रेसवरच उलटण्याची शक्यता दिसत आहे. मंगळवारी कर्नाटक हायकोर्टाने मालूर विधानसभा मतदारसंघातील निकाल रद्द केल्याने काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार नानजेगौडा यांना मोठा धक्का बसला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मालूर विधानसभा मतदारसंघातील निकालावर संशय घेत भाजपाचे उमेदवार एस. मंजुनाथ गौडा यांनी काँग्रेसचे आमदार नानजेगौडा यांच्यावर मतचोरीचा आरोप केला होता. त्यानंतर सुमारे २ वर्षांनी हायकोर्टाने आपला निकाल सुनावताना मतमोजणी प्रक्रियेतील कथित गडबड विचारात घेऊन पुन्हा मतमोजणी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ही मजमोजणी पुढील चार आठवड्यात घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
त्यावेळी जिल्हा मतदान आयुक्त मतमोजणी प्रक्रियेचे व्हिडीओ सादर करण्यात अयशस्वी ठरले होते. मालूर विधानसभा मतदारसंघ हा कोलार लोकसभा मतदारसंघात येतो. तसेच हा मतदारसंघ अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. येथे आतापर्यंतच्या इतिहासात काँग्रेसने चार वेळा बाजी मारली आहे. तर भाजपाने २ वेळा आणि जेडीएसने एकदा येथे विजय मिळवला होता.
दरम्यान, मे २०२३ मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत मालूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार एस. मंजुनाथ गौडा यांचा नानजेगौडा यांनी केवळ २४८ मतांनी पराभव केला होता. येथे अपक्ष उमेदवार विजय कुमार यांनी घेतलेली मते निकालांमध्ये निर्णायक ठरली होती. दरम्यान, निकाल लागल्यानंतर एक आठवड्याच्या आत मंजुनाथ यांनी कोर्टात धाव घेत निकालाला आव्हान दिले होते.