संतापजनक! महाराष्ट्राच्या ST चालकाला कर्नाटकात काळं फासलं; "कन्नड येत नसेल तर.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 10:17 IST2025-02-22T10:16:30+5:302025-02-22T10:17:17+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई बंगळुरू बसवर कन्नड कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

In Karnatak, Black paint sprayed on Maharashtra ST driver and Bus | संतापजनक! महाराष्ट्राच्या ST चालकाला कर्नाटकात काळं फासलं; "कन्नड येत नसेल तर.."

संतापजनक! महाराष्ट्राच्या ST चालकाला कर्नाटकात काळं फासलं; "कन्नड येत नसेल तर.."

कोल्हापूर - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाला कन्नड येत नसल्याने त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. कन्नड रक्षक वेदिकेच्या उन्माद कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले आहे. या घटनेमुळे सीमा भागातील लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई बंगळुरू बसवर कन्नड कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यात चालकाला वाहनातून खाली ओढून कर्नाटकात यायचं असेल तर कन्नड बोलायलाच हवं असं म्हणत कार्यकर्त्यांनी एसटी बसला आणि चालकाच्या तोंडाला काळे फासले. कर्नाटकातील चित्रदुर्गजवळ हा प्रकार घडला. या घटनेची माहिती चालकाने कोल्हापूर विभागीय कार्यालयाला दिली. संबंधित प्रकारामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य परिवहन मंडळाची ही बस प्रवाशांना घेऊन मुंबईहून बंगळुरूला चालली होती. त्यावेळी चित्रदुर्गजवळ अचानक काही कन्नड कार्यकर्त्यांनी या बसला रोखले. कार्यकर्ते कन्नड भाषेत घोषणा देत होते. त्यानंतर चालकाला बसमधून खाली उतरवत त्याच्याशी हुज्जत घातली. तुम्हाला कर्नाटकात यायचं असेल तर कन्नड यायलाच पाहिजे असा वाद कार्यकर्त्यांनी घातला. या वादात काही कार्यकर्त्यांनी एसटी बसला आणि चालकाला काळे फासले. त्यानंतर कार्यकर्ते तिथून पसार झाले.

दरम्यान, कित्येक दशकापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रलंबित आहे. या वादाचे अनेकदा पडसाद उमटले आहेत. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी पहिल्यांदाच समोर आली असं नाही. याआधीही या संघटनेने महाराष्ट्रातील वाहन चालकांवर हल्ले केलेत. २०२२ मध्ये बेळगावच्या हिरेबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्रातील वाहनांवर या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात दगडफेक करून बसेस, ट्रकच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. नंबर प्लेटचीही तोडफोड केली होती.  

हिंदी भाषिकांसाठी बंगळुरू बंद

अलीकडेच बंगळुरूत एक पोस्टर चांगलेच व्हायरल झाले होते. बंगळुरू उत्तर भारत आणि शेजारील राज्यांसाठी बंद आहे ज्यांना कन्नड शिकायचं नाही या पोस्टवरून नवा वाद निर्माण झाला होता. पोस्टमध्ये युजरने जे लोक स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा सन्मान करणार नसतील त्यांनी बंगळुरूत येऊ नये. बंगळुरू उत्तर भारत आणि इतर राज्यांसाठी बंद आहे ज्यांना कन्नड शिकण्याची गरज वाटत नाही. जे भाषा, संस्कृतीचा सन्मान करत नसतील त्यांची बंगळुरूला आवश्यकता नाही असं म्हटलं होते. 

Web Title: In Karnatak, Black paint sprayed on Maharashtra ST driver and Bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.